सांगली : जाडरबोबलादच्या एकास मरेपर्यंत सक्‍तमजुरी | पुढारी

सांगली : जाडरबोबलादच्या एकास मरेपर्यंत सक्‍तमजुरी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मतिमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या शब्बीर मीरासाहेब राजुरी (वय 51, रा. जाडरबोबलाद, ता. जत) याला मरेपर्यंत सक्‍तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी ः पीडित मुलगी ही जन्मजात मतिमंद आहे. याबाबत आरोपीला माहिती होती. दि. 4 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजता पीडित मुलगी ही तिच्या घराच्या पाठीमागे भांडी घासत बसली होती. त्यावेळी अचानकपणे पीडित मुलीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी तिच्या घरचे लोक घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी राजुरी हा पीडितेशी अश्‍लील वर्तन करत होता.

ही घटना पाहिल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी याचा जाब आरोपी शब्बीरला विचारला. त्यावेळी त्याने ‘मी चेष्टा करीत होतो, माझी चूक झाली’, असे सांगून तो माफी मागून तिथून निघून गेला.

हा प्रकार घडल्यानंतरही आरोपी वारंवार पीडित मुलीच्या घरी येत होता. याबाबत शंका आल्याने कुटुंबाने पीडित मुलीकडे चौकशी केली. तिने आरोपीने माझ्याशी जबरदस्ती केल्याचे हावभाव करून आईला सांगितले. त्यानंतर आरोपीविरुद्ध उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button