टीव्ही बंद करण्यासाठी वाजवला जातो भोंगा ; हे आहे कारण | पुढारी

टीव्ही बंद करण्यासाठी वाजवला जातो भोंगा ; हे आहे कारण

कडेगाव, संदीप पाटील : भोंग्यांवरून वादंग होत असताना खेराडेवांगी येथे मात्र भोंग्याचा अभिनव वापर केला जातो आहे. रोज सायंकाळी गावात भोंगा वाजतो अन् सर्व टीव्ही बंद केले जातात. शालेय विद्यार्थी अभ्यासाला बसतात. राज्यासाठी आदर्शवत असाच हा उपक्रम ठरत आहे.

राज्यात भोंग्यावरून उलटसुलट राजकारण होत आहे. खेराडेवांगी येथे मात्र यासाठी अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. गावातील प्राथमिक शाळेवर गावकर्‍यांनी हा भोंगा बसविला आहे. हा भोंगा दररोज संध्याकाळी सात वाजता वाजविण्यात येतो. यानंतर गावातील सर्वच घरातील टी.व्ही. बंद करण्यात येतात. सर्व मुले अभ्यासाला बसतात. आठपर्यंत म्हणजे एक तास मुले अभ्यासात मग्न असतात. गावात गेल्या काही महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचे सध्या स्वागत होत आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या मॉडेल स्कूल अंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून राबविण्यात येत आहेत. कडेगाव तालुक्यातील ‘स्वच्छ शाळा, आदर्श शाळा’ अंतर्गत आठ शाळांची निवड झाली आहे. या सर्व शाळा मॉडेल स्कूल म्हणून नावारूपास येत आहेत. आदर्श मॉडेल स्कूल म्हणून जिल्हा परिषद शाळा खेराडेवांगी ही शाळा आघाडीवर आहे. या ठिकाणी राबवण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शाळा, आरोग्य केंद्राची पाहणी करण्यासाठी युनिसेफचे पथक जिल्हा दौर्‍यावर आले होते. या पथकातील अधिकारी आदर्श शाळा आणि गावातील भोंग्याचा उपक्रम पाहून चकित झाले. या उपक्रमाचे कौतुकही केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी यांच्या संकल्पनेतून शिक्षक व ग्रामस्थ यांनी ही शाळा आदर्श मॉडेल बनविली आहे. शाळेत संगणक, शौचालय, परसबाग, क्रीडांगण, ग्रंथालय आणि संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ऑक्सिजन पार्क, बोलक्या भिंती आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सध्या मॉडेल स्कूलच्या कामकाजाबाबत शिक्षण विभागाच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन चालू आहे. खेराडेवांगी मॉडेल स्कूलचे काम सध्या जिल्ह्यात आदर्शवत आहे. इतर शाळांचेही मॉडेल स्कूलच्या दृष्टीने कामकाजही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
– अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी

Back to top button