बोर्ड लावून, नारळ फोडून श्रेय घेता येत नसते : मंत्री गुलाबराव पाटील | पुढारी

बोर्ड लावून, नारळ फोडून श्रेय घेता येत नसते : मंत्री गुलाबराव पाटील

विटा; पुढारी वृत्तसेवा : दुसर्‍याचं अपत्य आपल्या मांडीवर खेळले म्हणून आपले होत नसते, बोर्ड लावून, नारळ फोडून न केलेल्या कामाचे श्रेय घेता येत नसते, अशी टीका राज्याचे पाणपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

नागेवाडी गावाचे नागनाथनगर नामकरण, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नागनाथनगर जलशुध्दीकरण केंद्राचा लोकार्पण आणि ३ कोटी ५० लाखांच्या विविध विकासकामाच्या उदघाटन आणि लोकार्पण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार अनिलराव बाबर होते.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, अनिलभाऊ हा असा माणूस आहे की त्यांची मंत्रीमंडळातील आम्हा सर्व मंत्र्यांना आदरयुक्त भीती आहे. किंबहुना मंत्र्यांच्यापेक्षा काकणभर सरस त्यांचा अभ्यास असतो. या भागातली टेंभू योजना हे अनिलभाऊंनीच जन्माला घातलेले अपत्य आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीवर कुणी टीका करत असले तर हे दुदैवी आहे. त्यामुळे त्यांनी टीकाकारांकडे लक्ष देवू नये. जेवढी जास्त टीका तेवढी आपली जास्त हवा आहे.

पुढे मंत्री पाटील आमदार अनिल बाबर यांचे कौतुक करत म्हणाले, अनिलभाऊ आणि माझ्या राजकीय प्रवासात बरेच साम्य आहे. आम्ही कष्टातून आणि संघर्षातून इथंपर्यंत आलो. संघर्ष आम्हाला नवीन नाही. एवढ्या हालअपेष्टा सहन करूनही अनिलभाऊंच्या चेहर्‍यावर जे समाधान दिसते. ते फार महत्वाचे आहे. माझ्या पेक्षा चौदा वर्षांनी मोठे असून ही त्यांचा कामाचा आवाका, धमक पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. बाबर नावाचा राजकारणात ब्रॅण्ड तयार झाला आहे. राजकारणात काही ब्रेक लागतात. जसा मला पराभव स्वीकारावा लागला तसा त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला. पण जनतेला कळते कामाचा कोण असतो. फार कठीण असते. एकदा पराभव होऊन पुन्हा विजय मिळविणे. त्यासाठी जनतेच्या मनात घर करून राहिले पाहिजे. तुम्ही टेंभूवालेबाबा झाला आहात. काही सिझनेबल पुढारी असतात. पाऊस आला की छत्री उघडतात. आपण मात्र जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात जात असतो. असेही मंत्री पाटील म्हणाले

यावेळी आमदार बाबर म्हणाले, पहिल्यांदा विधान सभेला उभा राहिलो, त्यावेळी माझ्यासाठी लोक ओटा पसरून पै- पै गोळा करत होते. स्वत:च्या घरून भाकरी बांधून आणून माझा प्रचार केला. पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळी आमदारकीचा अप्रूप होते. पण सभापती असताना दुष्काळाची जी दाहकता भोगली होती. ती विसरू शकत नव्हतो. म्हणून पाणी या विषयावर काम करायचा निर्धार केला. आज शिवारात टेंभूचे पाणी फिरतयं तेव्हा स्वप्नपूर्तीचे समाधान होत आहे. कुणी टीका केली म्हणून मला काही वाटत नाही. कारण ही टेंभू योजना मीच पुर्ण केली असे मला म्हणायचे नाही. पण ही योजना व्हावी यासाठी रात्रीचा दिवस करून शासन दरबारी पाठपुरावा केला. झपाटल्यासारखे काम केलं. याचे सर्वांत मोठे समाधान आहे. मला माझ्या मंत्रीपदापेक्षा शेतकर्‍याच्या चेहर्‍यावरचा आनंद मोठा वाटतो. अजून नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत मतदारसंघाचा आमदार कोण ? याची विरोधक चर्चा करत आहेत. अडीच वर्षे अजून चर्चा करा. पण जनतेचा आशिर्वाद मला असला की, अशी टीका करणार्‍या विरोधकांचा पालापाचोळा झाल्याशिवाय राहणार नाही असेही बाबर म्हणाले.

सुहास बाबर म्हणाले, मध्यंतरी आंदोलनजिवी जमात निर्माण झाली तशी आता निवेदनजिवी लोक उदयास आले आहेत. ग्रामपंचायत आमची, पंचायत समिती आमची, आमदारकी आमची, मुख्यमंत्री आमचा काम आम्ही करतोय. ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाहीत ते आमच्यावर टीका करत आहेत. असल्याची दखल घ्यायची नाही, अशी अनिलभाऊंची शिकवण आहे. मंत्रीमहोदय तुमचा आशिर्वाद असला की असल्या निवेदनजिवी लोकांना डोकेसुध्दा वर काढून देणार नाही, हा गर्व नाही तर आत्मविश्वास आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी आमदार बाबर यांना विस्तारात मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरपंच सतीश निकम यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी अरुण खरमाटे, नगरसेवक अमोल बाबर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम, तहसीलदार ऋषिकेत शेळके, प्रांताधिकारी संतोष भोर, गटविकास अधिकारी संदीप पवार, प्रा. बबन निकम, माजी सरपंच हणमंतराव निकम, पंचायत समिती सभापती महावीर शिंदे, विटा मर्चंटस बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी, उत्तम चोथे, विनय भंडारे, हेमंत बाबर आदी उपस्थित होते.

Back to top button