

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पाचव्या दिवशी संस्मरणीय विजयाची नोंद केली. यासह यजमान संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाहुण्या न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी 299 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लिश संघाने 5 विकेट्स राखून पार केले. झंझावाती शतकासाठी जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा न्यूझीलंडने 7 बाद 224 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. पण त्यांचा दुसरा डाव 284 धावांवर आटोपला. डॅरिल मिशेलने नाबाद 62 धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने 3 बळी घेतले. अँडरसन आणि पॉट्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. अशाप्रकारे इंग्लंड संघाला 299 धावांचे लक्ष्य मिळाले.
प्रत्युत्तरात इंग्लंडने प्रथम जॅक क्रॉलीची विकेट गमावली. त्याला खाते उघडता आले नाही. त्याच्यापाठोपाठ ऑली पोपनेही 18 धावा केल्या. काही वेळात जो रूटही 3 धावा करून बाद झाला. अॅलेक्स लीज चांगला खेळत होता पण तो 44 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे 93 धावांत 4 विकेट्स गमावून इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला. पण यानंतरच एक चमत्कार घडला.
जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्स या जोडीने आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. अक्षरश: टी-20 शैलीत फलंदाजी करून या दोघांनी षटकार आणि चौकारांची आतषबाजीच केली. बेअरस्टोने 77 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलत 92 चेंडूत 136 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीत त्याने 14 चौकार आणि 7 षटकात ठोकले. बेन स्टोक्स 75 धावांवर नाबाद राहिला. त्याच्यासोबत बेन फॉक्स 12 धावा करत उभा होता. अशाप्रकारे इंग्लंडने 50 षटकांत 299 धावा करत 5 विकेट्स राखून सामना जिंकला. बेअरस्टोची खेळी किवीजसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. बोल्टने दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. न्यूझीलंडने पहिल्या डावात 553 आणि इंग्लंडने 539 धावा केल्या.
बेअरस्टोने (Jonny Bairstow) 77 चेंडूत शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील इंग्लंडचे हे आतापर्यंतचे दुसरे सर्वात जलद शतक आहे. इंग्लंडसाठी सर्वात वेगवान कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम गिल्बर्ट जेसपच्या नावावर आहे. जेसपने 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 76 चेंडूत शतक झळकावले होते.
कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 553 धावा केल्या होत्या. असे असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या डावात 500+ धावा करूनही संघ पराभूत होण्याची ही केवळ 8 वी वेळ आहे. पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये हे शेवटचे घडले होते. त्यानंतर पहिल्या डावात 500+ धावा करूनही बांगलादेश संघ न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये पराभूत झाला.