सांगली : टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांची वणवण | पुढारी

सांगली : टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांची वणवण

कडेगाव : रजाअली पिरजादे कडेगाव परिसर, शाळगाव खोरा तसेच नेर्ली खोरा व आदी ठिकाणी टेंभूच्या पाण्याअभावी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शाळगाव- बोंबळेवाडी, करांडेवाडी तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. कडेगाव तलावातील पाण्याची पातळी मृतसंचायखाली गेली आहे. परिणामी ऊस पिकासह आदी पिके वाळू लागली आहेत. टेंभू विभाग तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांचे अयोग्य नियोजन आणि मनमानी कारभाराचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांची वणवण सुरू झाली आहे. तातडीने तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरून घ्यावीत व मुबलक पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

तालुक्यात सध्या पावसाने ओढ दिली आहे. मागील एप्रिल व मे महिन्यात मोठा पाऊस झाला नाही.तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आशा परिस्थिती टेंभू सिंचन योजनेचे सुर्ली कामथी कालव्याला आवर्तन वेळेत सुटणे गरजेचे असताना टेंभूच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा मनमानी कारभाराचा मोठा फटका तालुक्याला बसला. शिवाजीनगर टप्पा क्रमांक 2 येथील ट्रान्सफॉर्मर काढून माहुली पंप हाऊसला जोडण्यात आले. परिणामी येथील शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंतीची करण्याची वेळ आली.

टेंभू सिंचन योजनेचा प्रारंभ कडेगाव तालुक्यात होतो. येथून पुढे आटपाडी, सोंगोला तालुक्यात पाणी जाते तेथील तलाव भरून घेतले जातात. मात्र कडेगाव तालुक्यातील तलाव पाण्याने भरून घेतले जात नाहीत. वेळेवर आवर्तन सोडले जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. टेंभू सिंचन योजनेची अन्यायकारक पाणी पट्टी वसूल केली जाते. मात्र पिके वाळू गेली तरी पाणी दिले जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Back to top button