Shiv Sena MLA : आम्हाला डावलले जाते ; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही काँग्रेसबाबत तक्रार | पुढारी

Shiv Sena MLA : आम्हाला डावलले जाते ; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही काँग्रेसबाबत तक्रार

विटा ; पुढारी वृत्तसेवा : महाआघाडीचे सरकार म्हणायचे आणि आमची कामे पद्धतशीरपणे डावलायची, हे यापुढे सहन करणे अशक्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेना आमदारांनी आपली तक्रार मांडली.

मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक झाली. त्यावेळी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामीण विकास, गृह, अर्थ आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमकतेने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले. मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही शासनाच्या विविध खात्यांनी बाबतचा निधी वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने दुजाभाव करीत आहेत, हे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. यावेळी खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीच्या एकूणच पक्ष आणि त्यांच्याकडे असलेल्या खात्याबाबत तक्रारी मांडल्या. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कारभारामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, प्रदीप जैस्वाल, अनिल राठोड यांनीही आपल्यावर व कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखवली.

अर्थ खात्याकडूनही शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत आहे, तसेच मंत्री अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना केराची टोपली दाखवली जाते. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे तत्परतेने होत आहेत, असा आरोप आमदारांनी केला.

गेल्या महिन्यात आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते सदाशिवराव पाटील यांच्यामध्ये टेंभू योजनेच्या कामांवरून श्रेयाचा वाद पेटला होता. तो अद्याप संपलेला नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा खोरेतून अतिरिक्त वाटपाचे पाणी टेंभू उपसा जलसिंचन योजनेला मिळवून दिल्याबद्दल बाबर आणि पाटील या दोन्ही गटांनी त्यांचे अभिनंदन करीत विट्यात जाहीर मिरवणूक काढण्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष 2024 च्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या मतदारसंघात ढवळाढवळ करीत आहेत, अशी तक्रारही आमदार बाबर यांनी केली आहे.

Back to top button