सांगली : द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर | पुढारी

सांगली : द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

तासगाव; दिलीप जाधव : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण या अस्मानी, द्राक्ष व्यापार्‍यांचे दर पाडण्याचे कारस्थान आणि पैसे बुडवून पलायन करण्याच्या सुलतानी संकटामुळे द्राक्ष शेतीस दरवर्षी अंदाजे दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त फटका बसत आहे. शेतकरी या नुकसानीमुळे आर्थिक संकटाच्या खाईत ढकलला जात आहे. द्राक्षशेती उद्ध्वस्त होऊन जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात 79 हजार 440 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. अंदाजे 23 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांपासून बेदाणा तयार केला जातो. 56 हजार क्षेत्रावरील द्राक्षे ही बाजारपेठेत जात असतात. बाजारपेठेत जाणार्‍या द्राक्षापैकी जवळपास 11 हजार हेक्टरवरील द्राक्षांची निर्यात होते, तर 45 हजार हेक्टरवरील द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत जातात. जिल्ह्यात दरवर्षी द्राक्ष विक्रीतून 5 हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल होते.

परंतु, अलीकडच्या दोन-तीन वर्षांत द्राक्षांचा पीकछाटणी हंगाम दीड महिना उशिरानेच सुरू होत आहे.छाटणी लांबत चालल्याने हंगाम ऐन भरात असताना पावसाचा फटका बसू लागलेला आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे पोंगा अवस्थेत असलेली द्राक्षे डाऊनीसारख्या रोगास बळी पडत आहेत. पोंगा अवस्थेतून वाचलेल्या द्राक्षबागेतील द्राक्षे फुलोरा अवस्थेत असताना पावसात कुजून जात आहेत. तयार झालेल्या द्राक्षांना पावसामुळे तडे जातात. पावसामुळे जवळपास 50 हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावरील द्राक्षशेतीला फटका बसतो. पावसाच्या तडाख्यात अंदाजे 2 लाख टन द्राक्षे ही दरवर्षी मातीमोल होत आहेत. वाया गेलेल्या द्राक्षांची बाजारभावातील किंमत सरासरी दीड-दोन हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या बरोबर मानवनिर्मित संकटेसुद्धा द्राक्ष शेतीच्या मुळावर उठली आहेत. देशात कुठेही वादळ अथवा नैसर्गिक आपत्ती आली; तर आपत्तीमुळे मार्केट बंद पडलेले आहे, मार्केटमध्ये दर पडले आहेत, अशी कारणे सांगून व्यापारी द्राक्षांचे दर पडतात. शिवाय उधारीवर द्राक्ष घेऊन जाणारे बहुतांशी व्यापारी उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे बुडवून पलायन करतात. यामुळे द्राक्ष शेतीला दरवर्षी जवळपास 500 कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

ही परिस्थिती अशीच राहिल्यास 50 टक्के द्राक्षबागा शेतकरी काढून टाकतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. या अस्मानी आणि मानवनिर्मित संकटातून शेतकरी व शेती वाचवायची असेल, तर साखर उद्योगाप्रमाणे द्राक्ष शेतीला पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. तसे झाले नाही तर भविष्यात द्राक्षशेती मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही.
जगन्‍नाथ मस्के, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघ

Back to top button