मिरज : ‘डेमू’साठी ‘एक्स्प्रेस’च्या दराची आकारणी | पुढारी

मिरज : ‘डेमू’साठी ‘एक्स्प्रेस’च्या दराची आकारणी

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेकडून तब्बल दोन वर्षानंतर डेमू गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु डेमूसाठी एक्स्प्रेसचे दर आकारण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सातारा – कोल्हापूर, मिरज-कोल्हापूर- मिरज, सांगली- कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर- पुणे इत्यादी पॅसेंजर सध्या सुरू झाल्या आहेत. या डेमूमधून पासधारकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार आणि नियमित प्रवास करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

डेमू बंद करण्यापूर्वी मिरज ते वळीवडे (गांधीनगर) दरम्यान कोणत्याही स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी 10 रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. तर मिरज ते कोल्हापूरसाठी 15 रुपये आकारण्यात येत होते. परंतु दोन वर्षांनंतर सुरू करण्यात आलेल्या डेमूसाठी मिरज ते कोल्हापूर दरम्यान कोणत्याही स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेसच्या दराप्रमाणे 30 रुपये आकारण्यात येत आहे. त्यामुळे मिरजेतून जयसिंगपूर, रुकडी, हातकणंगले इत्यादी जवळच्या स्थानकावर जाणार्‍या प्रवांशाची गैरसोय होऊ लागली आहे.

कराड ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणार्‍यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांची संख्या मोठी आहे. एस.टी. चे तसेच एक्स्प्रेसचे दर न परवडणारे प्रवासी डेमूने प्रवास करीत असतात. परंतु या डेमूसाठी देखील एक्स्प्रेसचे तिकीट आकारण्यात येत असल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे डेमूसाठी पूर्वीप्रमाणे दर आकारावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

दरामुळे प्रवाशांचा ओढा एक्स्प्रेसकडेच

मिरज-कोल्हापूर दरम्यान प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेसचे तिकीट आकारण्यात येत असल्याने डेमूने प्रवास करणार्‍या प्रवाशांचा ओढा एक्स्प्रेसकडेच असल्याचे दिसून येते. मिरज-कोल्हापूर-मिरज आणि सांगली-कोल्हापूर-सांगली डेमू दि. 15 एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु त्याला प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तातडीने डेमूचे दर कमी करून पूर्वीप्रमाणे दर आकारण्याची गरज आहे.

Back to top button