सांगली : पंक्या मुळीक गँगला मोका | पुढारी

सांगली : पंक्या मुळीक गँगला मोका

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

येथील पंक्या मुळीक गँगमधील पाचजणांवर मोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यास अप्पर पोलिस महासंचालक डॉ. राजेंद्र सिंग यांनी मंजुरी दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या तीन वर्षातील इस्लामपूर विभागातील मोक्याची ही आठवी कारवाई असल्याचेही त्यांनी सांगितले.

टोळीचा म्होरक्या पंकज नंदकुमार मुळीक (वय 22), सूरज राजाराम बाबर (वय 21), अजित उर्फ राजकुमार सिद्धाप्पा दोडमणी (वय 22, तिघे रा. इस्लामपूर), उमेश दिनकर नाईक (वय 21, रा. अहिरवाडी), ओंकार रमेश जाधव (वय 19, रा. गाताडवाडी) अशी या मोका लागलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले, या पाचजणांनी 6 ऑक्टोबर 2021 रोजी फिर्यादी प्रथमेश सुधीर कांबळे यास ‘तू विक्रांत क्षीरसागर याचेबरोबर का फिरतोस’, असे म्हणून त्यास मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून बेघर वसाहत, इस्लामपूर येथे नेवून मारहाण केली होती. त्यानंतर त्याला पेठ गावच्या हद्दीत नेवून मारहाण केली. सूरज बाबर याने तेथे पडलेला लोखंडी गज उचलून फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारला. ‘जर पोलिसांत तक्रार करशील तर जीवे मारून टाकू, अशी धमकीही त्याला देण्यात आली होती.

याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही या टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न, जखमी करणे, जबरी चोरी, घरफोडी, सावकारी, अपहरण करणे, हत्यारानिशी दुखापत करणे, गर्दी मारामारी करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, शिवीगाळी व दमदाटी करणे असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यातील सर्व आरोपींविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्याकडे पाठविला होता. त्यांनी दि. 05 नोव्हेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता या प्रस्तावाला अप्पर पोलिस महासंचालकांनी अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे या टोळी विरोधात येथील मोका न्यायालयात दि.4 एप्रिल रोजी मोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यावेळी पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण उपस्थित होते.

Back to top button