सांगली : संवाद हरवत चाललेल्या वृद्ध महिलांसाठी “सत्कार सांज”कार्यक्रम | पुढारी

सांगली : संवाद हरवत चाललेल्या वृद्ध महिलांसाठी "सत्कार सांज"कार्यक्रम

शेगाव /सांगली, पुढारी वृत्‍तसेवा : सांगली जिल्‍हातील शेगाव येथे नावारूपास आलेला ‘चिंच विसावा’ येथे उत्साही वातावरणात सत्कार सांज हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सर्व वृद्ध महिलांना एक दिवस मनसोक्त बालपणातील आठवणी, गाणी, कोडी, उखाणे त्यांची विशेषत्वाने ओळख करून देणे यासोबत सत्कार समारंभ व जेवण असा हा कार्यक्रम पार पडला.

सांजसावल्यांना औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर “आम्ही सावित्रीच्या लेकी ज्योती खालच्या पणती इवलासा का होईना प्रकाश देणार आणि आमच्या सवे हजारो पणत्या प्रकाशित करणार” अशा आशयाच्या ओळींनी ग्रुपच्या कार्याची ओळख संगीता शेडसाळे यांनी करून दिली. प्रत्येक सत्कार मूर्तीची तिच्या कलागुण सवयी कार्य यासह ओळख करून दिली. शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ताई हनमाने ,सारिका खिलारे ,अश्विनी बुरुटे यांनी काव्य गायन केले. या कार्यक्रमास डॉक्टर तेली यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रल्हाद बोराडे यांनी वेगवेगळी कोडी घालून गोष्टी सांगत सर्वाचे मनोरंजन केले. उज्वला बोराडे यांनी शेवटी महिला दिनाची प्रतिज्ञा सादर केली.

तसेच, संवाद हरवत चाललेल्या आजच्या काळात वयोवृद्ध महिलांना एक वेगळीच ऊर्जा या कार्यक्रमाने मिळाली. शेगाव परिसरातून खूप बोलक्या प्रतिक्रिया या कार्यक्रमास मिळाल्या. शेगाव येथील लेखक-कवी महादेव बुरटे यांनी अशा कार्यक्रमाचे नियोजन केल्यास मी सर्व प्रकारे मदत करेन माझ्या परीने आर्थिक सहाय्य सुद्धा करेन असे ते म्‍हणाले. तसेच त्यांनी लिहिलेली एक कविता सर्वांना भावली. या कार्यक्रमाचा शेवट भोजनाच्या आस्वादाने झाला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सदस्य भारती पट्टणशेट्टी ,कविता काटे ,अश्विनी बोराडे, सुकन्या स्वामी, मनिषा पवार यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा  

Back to top button