Sangli : आईचा गळा आवळून मुलाने केली आत्महत्या | पुढारी

Sangli : आईचा गळा आवळून मुलाने केली आत्महत्या

आष्टा : पुढारी वृत्तसेवा येथील दत्त वसाहत येथे मुलाने आपल्या 80 वर्षे वयाच्या आईचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. श्रीमती रतन रामचंद्र कांबळे (वय 80) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. शशिकांत रामचंद्र कांबळे (वय 49) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना मंगळवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती. (Sangli)

घटनास्थळावरून व आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील दत्त वसाहत याठिकाणी शिगाव (ता. वाळवा) येथील रामचंद्र नाना कांबळे व रतन कांबळे हे शिक्षक असलेले पती-पत्नी आपल्या दोन मुले, सुना व नातवंडांसमवेत रहात होते. गेल्या काही वर्षांपूर्वी रामचंद्र कांबळे व त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी श्रीमती रतन कांबळे या मुलगा शशिकांत, सून सुनीता व दोन नातवंडांसमवेत रहात होत्या. (Sangli)

गेल्या काही वर्षांपासून शशिकांत याला दम्याचा त्रास होता. अनेक प्रकारचे औषधोपचार करूनही काही फरक पडत नसल्यामुळे तो या आजाराला कंटाळला होता. गेल्या चार दिवसांपूर्वी शशिकांत याने दोन लहान मुलांना व आपल्या पत्नीला माहेरी रेठरेधरण या ठिकाणी पाठविले होते. घरी आई एकटीच होती. तो स्वत:ही पत्नीसोबत गेला होता. परंतु मंगळवारी तो एकटाच आष्ट्याला परत आला होता. त्याने पहिल्यांदा कॉटवर झोपलेल्या आईचा दोरीने गळा आवळून खून केला. (Sangli)

त्यानंतर त्याने दोरीने घरात गळफास लावून आत्महत्या केली.पत्नी सुनिता ही वारंवार फोन करूनही शशिकांत फोन उचलत नसल्यामुळे ती आपल्या भावासोबत आष्टा येथे घरी आली. हाका मारुनही घराचा दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा मोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शशिकांत याने आईचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. (Sangli)

हेही वाचलतं का?

Back to top button