सांगली : पुढारी वृत्तसेवा : Sangli Rain Update : सांगलीसह कडेगाव, मिरज, वाळवा, शिराळा, आटपाडी, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ अशा सर्वंच तालुक्यांत बुधवारी व गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेती, घरे, व्यवसाय अशा सर्वंच क्षेत्रांतील नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील बहुसंख्य भागात ढगाळ वातावरण होते. बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. शेतात पाणी साचले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. ऊसतोडी बंद झाल्या आहेत. तोडलेला ऊस आणि उसाने भरलेली वाहने शेतात अडकून पडली आहेत. दिवसभर वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकर्यांची खटाटोप सुरू होती. ऊसतोड मजुरांच्या खोपटीत पाणी शिरल्याने त्यांच्या निवार्याचे वांदे झाले आहेत.
जोरदार वार्याच्या तडाख्याने उभे पिके आडवी झाली आहेत. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला अशा सर्वच पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. घातलेला खर्चही निघणार की नाही, अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. शेतकर्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवारीही अनेक भागात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. हवेत प्रचंड गारवा जाणवत होता.
संततधार पावसाने सांगली आणि मिरजेतील सखल भागात पाणीच पाणी झाले होते. रस्ते, भाजीमंडई राडेराड झाली होती. परिणामी वाहनधारक, व्यापारी आणि नागरिक यांची तारांबळ उडाली.
जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांना पिकांची काळजी लागून राहिली आहे.
शहराच्या विस्तारित भागातील उपनगरांमध्ये पावसाच्या पाण्याने नागरिकांची दैना उडाली. कच्चे रस्ते पावसामुळे चिखलमय झाले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांची मोठी कसरत होत होती. केबल, गॅस पाईपलाईनसाठी खोदाई केल्याने रस्त्यावर पडून राहिलेल्या मातीमुळे या रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 64.9 मिलीमिटर पाऊस झाल्याची नोंद आहे. कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 89.2 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय मिलीमिटरमध्ये असा ः मिरज – 67.4, जत – 18.8, खानापूर -विटा 67.8, वाळवा – इस्लामपूर – 75.1, तासगाव – 65.7, शिराळा – 71.2, आटपाडी – 55.1, कवठेमहांकाळ – 75.3, पलूस – 74.9 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
अवकाळी पावसाने ऊस, डाळिंब, भाजी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्षबागांचे झाले आहे. बागा कोसळल्या आहेत. शेतकर्यांनी घातलेला खर्च तरी निघेल की नाही याची शंका आहे. त्यामुळे कृषिराज्यमंत्री यांनीच याची गंभीर दखल घेऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरीव भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
पंचनामे करा : महेश खराडे