लाखांच्या फार्म हाऊसमध्ये 36 कोटींचे ड्रग्ज | पुढारी

लाखांच्या फार्म हाऊसमध्ये 36 कोटींचे ड्रग्ज

हनिफ शेख

मोखाडा : नाशिकमधील ड्रग्जमाफिया ललित पाटील याचा कारखाना शहरापासून दूर शिंदे गावात आढळून आला. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर तसेच पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका फार्म हाऊसवर 36 कोटींचे ड्रग्ज पकडल्याने ग्रामीण भागात ड्रग्ज कारखाने उभारून आणि त्याचे वितरण शहरी भागात करून, तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे पोलिस कारवाईत स्पष्ट झाले आहे.

सध्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दररोज ड्रग्ज बनविण्याचे रॅकेट उघडकीस येत आहेत, त्याप्रमाणे पाहिल्यास हे रॅकेट राज्याला कवेत घेऊ पाहतेय की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहत आहे. या सर्वातील गंभीर बाब म्हणजे मोखाडासारख्या दुर्गम भागात कावळपाडा गावानजीक फार्म हाऊसवर हा साठा सापडला. त्याची एकूण किंमत 10 लाख रुपयांच्या पुढे नसेल; मात्र याच ‘लाखां’च्या फार्म हाऊसवर तब्बल 36 कोटी 90 लाख 74 हजार आंतरराष्ट्रीय बाजारभावाचे एमडी मेफेड्रान हा अमली पदार्थ सापडला. मुळात या फार्म हाऊससाठीची जागा अवघ्या साडेतीन लाखात घेतल्याचे आता समोर येत असून; याठिकाणी एक हॉल, बेडरूम किचन असलेले पत्र्याचे घर बांधण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी ड्रग्ज बनविण्यासाठी एक वेगळी छोटी रूम तयार करण्यात आली होती. त्या रूममध्येच हे ड्रग्ज बनवणारे आरोपी कधी यायचे, किती दिवस राहायचे याची जराही भणक स्थानिकांना नव्हती.

एमडी माणसाला थेट सारे विसरवते, संपवते!

कोणत्याही अमली पदार्थाच्या सेवनामुळे त्या व्यक्तीमध्ये व्यसनासक्ती निर्माण होते. ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकद़ृष्ट्या त्या अमली पदार्थाच्या मात्रेवर (डोस) अवलंबून राहते. शरीराच्या पेशींना त्या अमली पदार्थाची सवय लागते. अमली पदार्थ हे प्रामुख्याने मेंदूवर परिणाम करतात. सूत्रांनुसार, एमडी बनविण्यासाठी केटामाईन तसेच कॅन्सरवर पेनकिलर म्हणून उपचार करणार्‍या एका औषधाची मात्रा वापरली जाते. याच्या सेवनाने मेंदूच्या पेशींच्या कार्यात बिघाड होतो. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्ती एकलकोंड्या असतात. एमडी सेवन केलेला व्यक्ती खूप सैरभैर होतोे. काही ‘स्टिम्युलन्स’ असे असतात की, त्यामुळे त्या व्यक्तीला आपण हवेत तरंगत आहोत, असे वाटते. पण हेच व्यसन त्याचे काही महिन्यांत आयुष्य संपवते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या एजन्सीच्या मते, जगभरात सुमारे 234 दशलक्ष लोक या अमली पदार्थाचे सेवन करतात. तर दरवर्षी सुमारे 2 लाख लोक या अमली पदार्थामुळे आपला जीव गमावतात. पण तरीही त्याचा वापर केला जात आहे.

केमिकल कंपनीत काम करून ड्रग्ज बनवायला शिकला

अमली पदार्थ मॅफेड्रॉन बनवणारा मास्टरमाईंड हा समीर चंद्रशेखर पिंजार हा असून, तो पूर्वी हैदराबाद येथे एका केमिकल कंपनीत कामाला होता. त्याच्यावर हैदराबाद येथे एक गुन्हा दाखल आहे. त्याला केमिकलविषयी पूर्ण माहिती असल्याने, त्याने दीड-दोन वर्षांपूर्वी मोखाडा येथे अमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू केला. त्याचे शिक्षण हे सातवी-आठवीपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button