Black Rice: आरोग्यदायी ‘ब्लॅक राईस’चे गुळसुंदे येथे यशस्वी उत्पादन | पुढारी

Black Rice: आरोग्यदायी 'ब्लॅक राईस'चे गुळसुंदे येथे यशस्वी उत्पादन

जयंत धुळप

रायगड : ब्लॅक राईस अर्थात फॉरबीडन्ट राइस म्हणजेच बहुगुणी काळा तांदूळ (Black Rice) आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात गुळसुंदे येथील प्रयोगशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी यश मिळविले आहे. एकरी 15 क्विंटल उत्पादकता साध्य करण्यात गाडगीळ यशस्वी झाले आहेत. गाडगीळ यांना राज्य शासनाचा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.

दरम्यान साधारण 120 -130 दिवसांत हा काळा तांदूळ तयार झाला आहे. शेतकर्‍यांनी पारंपरिक तांदळाच्या वाणाबरोबर इतर ही काळ्या तांदळासारखे नाविन्यपूर्ण वाण लावल्यास त्याला चांगला भाव मिळेल व शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होइल, असा विश्‍वास गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे. (Black Rice)

संबंधित बातम्या 

जपानमध्ये फक्त राजघराण्यासाठी हा तांदूळ पिकवला जात होता. 

ब्लॅक राईस हा फॉरबीडन्ट राइस म्हणून ओळखला जातो. ही जपानमधील तांदळाची मूळ जात आहे. जपानमधील फक्त राजघराण्यासाठी हा तांदूळ पिकवला जात होता. या मध्ये अन्थोसॅयनीन हे नैसर्गिक पिग्मेंट आहे, ज्यामुळे याला काळा रंग प्राप्त होतो व उकडल्यानंतर याला डार्क परपल कलर (जांभळा) येतो. उकड्ण्याआधी चोवीस तास तांदूळ भिजत ठेवून नंतर तो उकडला जातो, अशीही माहिती गाडगीळ यांनी दिली.

Black Rice : काळ्या तांदळात अ‍ॅन्टीऑक्सीडंट गुणधर्म

काळ्या तांदळात अ‍ॅन्टीऑक्सीडंट गुणधर्म असल्याने याला विशेष मागणी आहे, त्याच बरोबर या तांदळात आर्यन ,व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स मोठ्याप्रमाणात आढळतात. फायबर मोठ्याप्रमाणात आढळते व त्यामुळेच वेट लॉससाठी हा तांदूळ उपयोगी पडतो . या तांदळात मधुमेह व कोलेस्टेरॉल कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. त्याच प्रमाणे या तांदळात अ‍ॅन्टीकॅन्सर गुणधर्म असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. विशेष करुन डेझर्ट, केक, ब्रेड, नूडल्स यासाठी हा तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

इंडोनेशिया, चायना, म्यानमार तसेच उत्तर भारतात हा तांदूळ पिकवला जातो

इंडोनेशिया, चायना, म्यानमार तसेच उत्तर भारतात हा तांदूळ पिकवला जातो. चार गुंठे क्षेत्रावर गाडगीळ यांनी काळ्या तांदळाचे उत्पादन घेतले आहे. तर उर्वरीत क्षेत्रावर आंबेमोहर तांदळाचे जिल्ह्यात प्रथमच उत्पादन घेतले आहे. जे ही आपल्याकडे पहिल्यांदाच घेतले आहे. उत्पादन चांगले आहे. साधारण एका गुंठ्याला 40 किलो म्हणजे एकरी 15 क्विंटल उत्पादकता साध्य करण्यात यश आले आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील भात संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी देखील गाडगीळ यांच्या भातशेतीची पहाणी करुन या यशस्वी प्रयोगावर शिक्कामोर्तब केले आहे.

काळा तांदूळ मानवी आरोग्याकरीता अत्यंत बहूगुणी 

मानवी आरोग्याकरीता अत्यंत बहूगुणी असा हा काळा तांदूळ आहे. जे लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी भात खाणे टाळतात, त्या लोकांसाठी काळा तांदूळ फायदेशीर आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी काळा तांदूळ फायदेशीर आहे. यात आढळणारे फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

कर्करोगासारखे रोग टाळण्यात मदत 

काळ्या तांदळात भरपूर मात्रेत फायबर आढळते. जे बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर करतात. याने पोट फुगणे आणि पचनसंबंधित तक्रारही दूर होते. दररोज याचे सेवन केले जाऊ शकते. काळ्या तांदळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत आढळते, जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोगासारखे रोग टाळण्यात मदत करते. याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. या तांदळांचा गडद काळा रंग यात आढळणारे विशेष अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे ते त्वचा आणि डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठीही फायदेशीर आहे. काळ्या तांदळाचे सेवन शरीरातून हानिकारक आणि नको असलेले तत्त्वांना बाहेर फेकून आंतरिक सफाईमध्ये मदत करते. हे लिव्हरला स्वच्छ करण्यातही मदत करत असते. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काळ्या तांदळाची शेती फायदेशीर ठरते, असेही गाडगीळ यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button