रायगड : शहापूर- धेरंडमध्ये पुन्हा घुसला समुद्र | पुढारी

रायगड : शहापूर- धेरंडमध्ये पुन्हा घुसला समुद्र

अलिबाग; जयंत धुळप :  गेल्या २० फेब्रुवारीपासून समुद्राच्या सुरु झालेल्या उधाणांच्या भरतीचे खारे पाणी अलिबाग तालुक्यांतील शहापूर व घेरंड गावामध्ये पुन्हा घुसले आहे. गावांतील ३०० एकर भातशेती आणि मत्स्यतलाव ओलांडून गावांतून पूर्वेच्या २३ घरांभोवती पोहोचून, रात्रीच्या वेळेस काही घरात खारेपाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.

पाणी रात्रीच्या वेळेसच जास्त येते. घरांच्या पायरी पर्यंत पोहोचले आहे तर, मत्स्य तलावात पाणी शिरून मासे देखील वाहून गेले आहेत. जमीन गाळाची असल्याने घरे मातीत खचत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री सुमारे २३ घरांसहित निवृत्त शिक्षक प्रभाकर नारायण पाटील व कुसुम वय वर्षे ८२ यांचे घरात पाणी शिरून सर्व कागदपत्रे १ लाख रुपये तसेच घरातील वस्तूंचे खूप नुकसान झाले आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी फुटलेला बंधारा ५६० दिवस झाले तरी दुरुस्त करून पून्हा बांधला नसल्याने तो आणखी फुटत राहिला त्यामुळे तो आता १३० मिटर लांब व ७ मिटर खोल झाल्याने मोठ्या प्रमाणात खारे पाणी गावांत घुसत आहे. जमिनीची मालकी एमआयडीसीची आहे. ज्या गावांची जमीन संपादित केली त्या गावांचे खार बंधारे एमआयडीसीने २००६ ते २०१९ पर्यंत ताब्यात घेतले न्हवते. तसेच खाजगी खारभूमी असल्याने खारभूमी विभाग त्यावर खर्च करू शकत नाही. त्यावर श्रमिक मुक्ती दलांनी २३ डिसेंबर २०१९ रोजी अंधेरी येथे एमआयडीसीचे सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या समवेत बैठक झाल्यानंतर खारबांधाची जबाबदारी पहिल्यांदा १० वर्षानंतर एमआयडीसीने स्वीकारली. मूळ संरक्षक बंधारे हे मुख्य रस्त्यापासून १ ते २ किमी दूर आहेत व तेथे पक्के मटेरियल जाण्यासाठी पोहोच रस्ते नाहीत.

होळीचे उधाण यापेक्षा दीडपट

पुढचे होळीचे उधाण या पेक्षा दीड पट मोठे आहे. पाणी नेमके रात्री जास्त येते. किमान ५०० एकर जमीन जी संपादना मध्ये नाही ती देखील नापीक होणार आहे. महिला वर्ग संतप्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या बैठकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही कधीही कायदा सुव्यवस्था कधीही धोक्यात येऊ शकते, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वय राजन भगत यांनी दिली आहे.

 पावसाळ्यापूर्वी तोडगा काढा!

शहापूर, धेरंडला बसलेल्या उधाणाने गावातील शेती, तलाव तसेच घरांमध्ये शिरल्याने येथील शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासाठी शासनाने कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता तातडीने पावसाळ्यापूर्वी या समस्येवर तोडगा काढावा, अशी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे. त्यांनी तातडीने धेरंड, शहापूरचा दौरा केला.

Back to top button