रायगड : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी अँटी करप्शन कार्यालयात चौकशीला हजर | पुढारी

रायगड : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी अँटी करप्शन कार्यालयात चौकशीला हजर

रायगड; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आज (बुधवार) सकाळी साडेअकरा वाजता अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ते आमदार आहेत. राजन साळवी यांच्या समवेत शेकडो शिवसैनिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर जमून घोषणाबाजी केली.

शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची सोमवारी (दि. 5) अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी  केली जाणार होती. मात्र, राजन साळवी चौकशीला आलेच नसल्याने ही चौकशी झाली नाही. त्यांनी चौकशीला येण्याबाबत पुढील तारीख मागितली होती. त्यामुळे ते हजर राहिले नव्हते.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला विविध प्रकरणामध्ये अडकविण्याचा खटाटोप सत्ताधारी शिंदे, फडणवीस सरकारने सुरु केल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी अ‍ॅड. अनिल परब, वैभव नाईक यांनाही अशाच चौकशांना सामोरे जावे लागले आहे. आता राजन साळवी यांना अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलेले होते. साळवी यांच्या मालमत्तेसंदर्भात चौकशीसाठी ही नोटीस बजावण्यात आली होती. त्‍याला अनुसरून आमदार राजन साळवी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहिले आहेत.

शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत माझी मालमत्ता चौकशी लावली आहे. त्यानुसार मी आज अलिबाग येथे चौकशीसाठी आलो आहे. मी चौकशीला सामोरे जाणार आहे. या चौकशीमध्ये केवळ भ्रम निरास त्‍यांच्या पदरी पडणार आहे.

आमदार राजन साळवी

हेही वाचा : 

Back to top button