रायगड : जिथे सन्मान मिळत नाही, बंधने लादली जातात तिथे थांबायचे नसते; संभाजीराजेंचे सूचक वक्तव्य (video) | पुढारी

रायगड : जिथे सन्मान मिळत नाही, बंधने लादली जातात तिथे थांबायचे नसते; संभाजीराजेंचे सूचक वक्तव्य (video)

रायगड; इलियास ढोकले- प्रसाद पाटील

स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी आगामी काळात आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करणार आहे, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे अठ्ठेचाळीसाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी केली. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व शहाजीराजे यांच्या काळातील ऐतिहासिक दाखले देत सद्यस्थितीवर परखड भाष्य केले.
स्वराज्य निर्माण करत असताना अनेकांनी केलेल्या विरोधाचा संदर्भदेखील त्यांनी परखड मत व्यक्त करताना केला. शिवकालीन घटनांचा संदर्भ उपस्थित शिवभक्तांना देताच टाळ्यांचा गडगडाटात व घोषणांमध्ये उपस्थितांनी त्याला प्रतिसाद दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे अठ्ठेचाळीसाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या तारखेनुसार सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज रायगडावरील राजदरबारात झालेल्या विशेष सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवभक्त मावळ्यांना संबोधित केले.

राज्यसभेच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती कोणती भूमिका मांडतात याकडे उपस्थित शिवभक्तांसह तमाम राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, संभाजीराजेंनी थेट या विषयाला हात न लावता शिवकालीन इतिहासातील दाखले देत सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य केले. ज्या ठिकाणी सन्मान मिळत नाही, बंधने लादली जातात त्या ठिकाणी थांबायचे नसते, असे परखड भाष्य त्यांनी यावेळी केले.
स्वराज्य संघटनेच्या कामाची सुरुवात किल्ले रायगड पासूनच झाली आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या विस्तारीकरणासाठी आपण स्वतंत्र दौरे करणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी करताच उपस्थितांनी छत्रपतींच्या घोषणा व टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्यांना प्रतिसाद दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीराजे लाखो शिवभक्तांसह शिवराज्याभिषेक दिनाकरिता गडावर उपस्थित राहत आहेत. आपल्या पंधरा ते सतरा मिनिटांच्या भाषणामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी कोणत्याही राजकीय पक्षांवर अथवा सद्यस्थितीवर थेट भाष्य न करता ऐतिहासिक दाखले देत सूचक वक्तव्ये केली. या त्यांच्या मार्मिक भाषेत उपस्थितांमध्ये योग्य संदेश गेल्याची भावना उपस्थित शिवभक्तांनी व्यक्त केली.

Back to top button