शिवेंद्रराजे यांनी संभाजीराजेंना गाठले ‘खिंडीत’!

शिवेंद्रराजे यांनी संभाजीराजेंना गाठले ‘खिंडीत’!

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या उमेदवारीवरून चर्चेत असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना सातारचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी 'खिंडीत' गाठले. हा प्रकार कुठल्या कुरघोडीचा नव्हे बर का!, हा आहे राजघराण्यातील दोन मातब्बरांमध्ये झालेल्या भेटीचा योग. लिंबखिंडीत आ. शिवेंद्रराजे व संभाजीराजे यांची रविवारी सायंकाळी अचानक भेट होऊन दोघांनी एकमेकांची विचारपूस करत दिलखुलास गप्पा मारल्या. त्याचे झाले असे, रविवारी सायंकाळी आ. शिवेंद्रराजे भोसले हे कुडाळ येथे कार्यक्रमानिमित्त निघाले होते.

त्याचवेळी संभाजीराजे छत्रपती हे पुण्याच्या दिशेने निघाले होते. संभाजीराजे छत्रपती यांचे वाहन पाहिल्यानंतर शिवेंद्रराजेंनी त्यांना लिंबखिंड येथे ओव्हरटेक करून गाठले. लिंबखिंड येथे संभाजीराजे व आ. शिवेंद्रराजे यांची भेट झाली. अचानक भेट झाल्यानंतर दोघांच्याही चेहर्‍यावर आनंद होता. दोघांनीही हस्तांदोलन करत सुमारे 15 मिनिटे चर्चा केली. छत्रपती घराण्यातील सदस्यांची आस्थेवाईक विचारपूस करण्याबरोबरच काही राजकीय बाबींवरही दोघांनी आपली मते व्यक्‍त केली.

ही भेट झाल्यानंतर लागलीच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट करत आ. शिवेंद्रराजेंनी आमच्या वाहनाला ओव्हरटेक करत त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. या भेटीने आनंद झाला व दोन्ही छत्रपती घराण्यांचे ऋणाणुबंध असेच वृध्दिंगत राहोत, हीच आईभवानी चरणी प्रार्थना, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच आ. शिवेंद्रराजेंनी संभाजीराजेंंचा गेम झाला अशी टीका केली होती. त्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, शिवेंद्रराजेंचे स्वीय सहाय्यक गणेश साबळे, उपस्थित होते.

शिवेंद्रराजेंनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये

सातारा : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा उमेदवारीबाबात कोल्हापूरचे छत्रपती घराणे व शिवसेना पाहून घेईल. यामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, अशी टीका गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभा निवडणुकीत गेम झाल्याची टीका आ. शिवेंद्रराजेंनी केली होती. त्याला ना. शंभूराज देसाईंनी प्रत्त्युत्तर दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. देसाई म्हणाले, शिवेंद्रराजे यांनी बोलण्यापेक्षा शाहू महाराज छत्रपती यांनी स्पष्ट मत व्यक्‍त केले आहे. त्यामुळे आता शाहू महाराजांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. कोणीही गेम केलेला नाही. विशेषत: शिवसेनेने गेम केलेला नसल्याचे शाहू महाराज यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे शिवेंद्रराजे यांनी विनाकारण आगीत तेल ओतण्याचे काम करू नये. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेना व छत्रपती घराण्यातील असून ते पाहून घेतील. इतरांनी विनाकारण यामध्ये लुडबूड करू नये, असाही टोला ना. देसाई यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news