म्हाडाच्या 4877 घरांसाठी थंड प्रतिसाद; अर्ज करण्यास 30 मेपर्यंत मुदतवाढ | पुढारी

म्हाडाच्या 4877 घरांसाठी थंड प्रतिसाद; अर्ज करण्यास 30 मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : म्हाडाच्या पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांतील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील सुमारे 4877 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्यास 30 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, या वाढीव मुदतीनंतरही नागरिकांचा सोडतीला थंडा प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत केवळ 19 हजार 566 जणांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक आहेत.
मार्च महिन्यात म्हाडा पुणे मंडळाने सोडत जाहीर केली. 8 मार्चपासून या सोडतीमधील घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली.

ऑनलाइन अर्जनोंदणीची मुदत 8 एप्रिल रोजी सायंकाळी पाचपर्यंत होती. मात्र, या कालावधीत केवळ 16 हजार अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे अर्ज करण्यासाठी 30 मे रोजी रात्री 11:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या 100 ने वाढविण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.

दरम्यान, आत्तापर्यंत केवळ 38 हजार 545 नागरिकांनी सोडतीसाठी नोंदणी केली आहे, तर केवळ 19 हजार 566 जणांनी पैसे भरले आहेत. त्यामुळे या सोडतीलादेखील नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ही सोडत नवीन संगणक प्रणाली आयएचएलएमएस 2.0 नुसार होत आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सदनिकेसाठी नोंदणी करता येते. नोंदणी, अर्ज भरणे आणि ऑनलाइन पैसे भरणे, या सुविधा या प्रणालीद्वारे करता येतात. मात्र, तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरताना, कागदपत्रे जोडताना असंख्य अडचणी येत आहेत. त्यामुळे सोडतीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button