सिरमची मलेरियावरील लस आफ्रिकेला रवाना | पुढारी

सिरमची मलेरियावरील लस आफ्रिकेला रवाना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मलेरियाची लस आफ्रिकेला पाठवली असून पहिल्या टप्प्यात 43 हजार 200 डोस सोमवारी (दि. 20 मे) रवाना करण्यात आले. मलेरियाविरुद्धच्या जागतिक लढ्यात हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी, नफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या डॉ. मेहरीन दाटू वकिली अधिकारी सिल्व्हिया टेलर आदी उपस्थित होते. आतापर्यंत सिरमने दरवर्षी 100 दशलक्ष डोसपर्यंतची क्षमता असलेले 25 दशलक्ष डोस तयार केले आहेत.

मलेरियावरील लसीच्या पहिल्या टप्प्यातील डोस शिपमेंट सेंट्रल आफ्रि कन रिपब्लिकला पाठवले जाणार आहेत. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये दक्षिण सुदान आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोसारख्या इतर आफ्रिकन देशांना पाठवले जाणार आहे. ‘सीएआर’ क्षेत्रासाठी ठरवलेल्या एकूण 1 लाख 63 हजार 800 डोसपैकी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सुविधेतून 43 हजार 200 डोस पाठवले आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि नोवोवॅक्सच्या मॅट्रिक्स-एम यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही लस मलेरियाचा प्रादुर्भाव झालेल्या आफ्रिकेतील स्थानिक प्रदेशातील मुलांसाठी वापरण्यासाठी अधिकृत केलेली दुसरी मलेरिया लस आहे. या लसीला युरोपियन आणि विकसनशील देशांच्या क्लिनिकल ट्रायल्स पार्टनरशिप, वेलकम ट्रस्ट आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांचे सहकार्य मिळाले आहे.

हेही वाचा

Back to top button