पुणेकरांनो काळजी करु नका ! तूर्तास पाणीकपात नाही.. | पुढारी

पुणेकरांनो काळजी करु नका ! तूर्तास पाणीकपात नाही..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणातून सध्या पुणे शहरासाठी दररोज 1650 एमएलडी पाणी उचलले जात असल्याने पुढील दोन महिन्यांसाठी 3.24 टीएमसी पाणी आवश्यक आहे. सध्या खडकवासला धरणात 6.58 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी शहरात पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिका आणि जलसपंदा विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या काळात खडकवासला धरणातून निश्चित कोट्यापेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले.

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, जलसंपदा आणि हवामान विभागाचे अधिकारी यांची शुक्रवारी बैठक झाली. शहराला दररोज 1650 एमएलडी पाणी खडकवासला धरणातून घेतले जाते. परंतु, धरणात सध्या 6.58 टीएमसी पाणीसाठा आहे. हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी यंदा सरासरी 106 टक्के पाऊस होणार आहे असे सांगितले असून त्यामुळे सध्या तरी शहरात पाणी कपात न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात 1 जून रोजी उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेऊन कपातीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

शहराला तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. पाणीकपातीचा निर्णय होणार नाही. तरी पुणेकरांनी पाणी जपून वापरावे. कालवा समितीची बैठक 1 जूननंतर होणार आहे.

– नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

हेही वाचा

Back to top button