Global Extinction Species Day Special | ’डोडो’ पक्षी आता उरला फक्त चित्रात! | पुढारी

Global Extinction Species Day Special | ’डोडो’ पक्षी आता उरला फक्त चित्रात!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंदी महासागरात सापडणारा डोडो पक्षी सुमारे 400 वर्षांपूर्वी नामशेष झाला. त्यावर आपण काहीच उपाय
न केल्याने आता तो फक्त चित्रात दिसतो. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील 1500 पेक्षा जास्त प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगात 27 ते 50 टक्के पशू, पक्षी आणि विविध प्राण्यांच्या जाती लुप्त होत असल्याची चिंता यानिमित्ताने तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मे महिन्यातला तिसरा शुक्रवार जगभरात ‘लुप्त प्रजाती दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा शुक्रवारी (17 मे) रोजी जगभरात लुप्त प्रजाती दिन साजरा झाला. भारतात डोडो नावाचा पक्षी होता. तो हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर सापडायचा, मात्र हा पक्षी 250 वर्षांपूर्वी तिथून कायमचा लुप्त झाला. त्याच्या फक्त आता आठवणी फोटोरूपात उरल्या आहेत. अशा पंधराशेपेक्षा अधिक जाती आहेत, यात पशू, पक्षी आणि विविध प्रकारचे प्राणी यांचा समावेश आहे. सध्या एकूण 1555 लुप्तप्राय प्रजाती सरकारी कायद्याद्वारे संरक्षित आहेत.

उपाय काय?

घरात, गॅलरीत, झाडावर
एक तरी घरटे लावा
पक्ष्यांना, प्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवा
पेंट, तेल, ऑइल, प्लास्टिक पाण्यात टाकले की ते थेट महासागरात जाते त्यामुळे पक्षी, मासे समुद्री जीव मरतात
हस्तिदंत, मोरपीस, प्राण्यांची कातडी, कासव विकत घेऊन घरात ठेवू नका यामुळेच प्राण्यांची शिकार अन् तस्करी वाढत आहे आणि प्राणी, पक्षी नामशेष होत आहेत.

डोडो पक्षाची कहाणी…

डोडो (राफस कुकुलैटस कुळातील पक्षी होता) हा नामशेष झालेला पक्षी आहे. तो हिंदी महासागरातील मादागास्कर बेटाच्या पूर्वेला असलेल्या मोरिशस बेटावर स्थानिक होता. हा कबूतर कुळातील पक्षी होता. पांढरा, राखाडी, तांबडा आणि पिवळ्या रंगाच्या डोडोचे वर्णन डच खलाशांच्या प्रवासवर्णनात आढळते.

लुप्त प्राण्यांच्या प्रजातीत दहा वर्षांत वेगाने घट

जगात आज लुप्त प्राण्यांच्या प्रजातीची घट 27 ते 50 टक्क्यांपर्यंत गेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मानवी हस्तक्षेप, वाढते प्रदूषण, वाढती जंगलतोड या कारणांमुळे अनेक प्राणी, पक्षी त्यांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. डेव्हिड रॉबिन्सन या शास्त्रज्ञाने 2006 मध्ये हा दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली आणि संयुक्त राष्ट्रसंघाने मे महिन्यातील तिसरा शुक्रवार हा लुप्त प्रजाती दिन म्हणून घोषित केला.

तुम्ही मोरपीस, कासव, हस्तिदंत विकत घेऊ नका. या वस्तू जेवढ्या जास्त विकल्या जातात तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शिकार वाढते, असेही त्याचे गणित आहे. त्यामुळे 195 देशांनी त्यांच्या त्यांच्या देशातील लुप्त प्रजाती शोधायला सुरुवात केली तेव्हा हा आकडा वाढतच चालल्याचे लक्षात आले.

-दिलीप यार्दी, पर्यावरणतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा

Back to top button