Loksabha election | उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटीस बजाविण्यास सुरुवात | पुढारी

Loksabha election | उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटीस बजाविण्यास सुरुवात

पुणे : पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (13 मे) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक 74 लाख 97 हजार रुपये प्रचार खर्च हा शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. त्याखालोखाल पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 69 लाख 41 हजार रुपये खर्च केला आहे. शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 53 लाख 69 हजार, तर पुण्याचे महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 46 लाख 43 हजार रुपये प्रचारावर खर्च केला आहे.

चौघाही उमेदवारांच्या प्रचार खर्चात तफावत येत असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून तिसरी नोटीस बजाविण्यात आली आहे.
पुणे, शिरूर मतदारसंघांतील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात आली. पहिली तपासणी 3 मे, दुसरी 7 मे, तर तिसरी तपासणी 11 मे रोजी करण्यात आली. या तिन्ही तपासणीत शिरूरमधील आढळराव, कोल्हे आणि पुण्याचे मोहोळ, धंगेकर यांच्या प्रचार खर्चात तफावत आढळली होती.

त्यामुळे शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आणि पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी काही खर्च मान्य केला, तर काही खर्च अमान्य केला होता. शेवटच्या खर्च तपासणीत देखील या चौघांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाच्या शॅडो रजिस्टरमधील खर्चात तफावत आली आहे.

दरम्यान, प्रचार खर्चातील तफावतीबाबत आढळराव, कोल्हे, मोहोळ आणि धंगेकर यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर खुलासा करावा लागणार आहे. खुलासा न केल्यास हा खर्च मान्य असल्याचे समजून संबंधित उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. तसेच 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर 30 दिवसांत पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या खर्च निरीक्षकांसमवेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहून खर्चातील तफावत दूर करावी लागणार आहे.

उमेदवारांच्या खर्चाचा आढावा

उमेदवार शॅडो रजिस्टरनुसार उमेदवारनिहाय तफावत

  • शिवाजी आढळराव 74,97,086     32,63,909    42,33,177
  • अमोल कोल्हे 53,69,925             36,38,491    17,31,434
  • मुरलीधर मोहोळ 69,41,716        19,50,327    49,91,389
  • रवींद्र धंगेकर 46,43,533             32,56,253    13,87,280

हेही वाचा

Back to top button