असंही एक मंदिर जे वर्षातून फक्त 2 महिनेच दिसतं! पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर | पुढारी

असंही एक मंदिर जे वर्षातून फक्त 2 महिनेच दिसतं! पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर

भोर : पुढारी वृत्तसेवा : ब्रिटिशकालीन भाटघर धरणातील पाणी घटल्याने वर्षातील 10 महिने पाण्याखाली असलेले कांबरे गावच्या हद्दीतील वेळवंडी नदीपात्रातील पांडवकालीन श्रीकांबरेश्वर मंदिर आता उघडे पडले आहे. हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी भाविकांसह इतिहास संशोधक गर्दी करीत आहेत. भोर तालुक्यापासून 35 किलोमीटर अंतरावर वेळवंडी नदीच्या किनार्‍यावर कांबरे गाव वसलेले आहे. या गावातील धरणपात्रात प्राचीन कांबरेश्वराचे मंदिर आहे. सध्या भाटघर धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने हे मंदिर दिसू लागले आहे. या मंदिराचे पूर्वीचे नाव कर्मगरेश्वर असे आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वतीमातेची मूर्ती आणि नंदी आहेत. हे मंदिर मे आणि जून महिन्यात पाण्याबाहेर असते, तर इतर 10 महिने पाण्यात असते.

या मंदिरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. मंदिराच्या कळसाचे आणि त्याच्यावरील बाजूचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि भाजलेल्या विटांचे आहे. मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. हे दगड साधेसुधे नसून 20 मजुरांना देखील एकत्र येऊन उचलता येणार नाहीत इतके ते मोठे आहेत. पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करून आयताकृती दगड एकावर एक बसवून मंदिराची रचना केली आहे.

हे मंदिर पाण्यातून पूर्ण बाहेर आल्याने भुतोंडे, वेळवंड भागासह इतर ठिकाणांहून नागरिक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. यापूर्वी मंदिरात जाताना वर चढून जावे लागत असे. पण, आता गाळामुळे मंदिराच्या पायर्‍या गाडल्या गेल्या आहेत. या मंदिरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. या मंदिराचा पाया आणि बांधकाम आजही मजबूत आहे. पण, धरणांच्या लाटांचा थोडाफार फटका बसला आहे. मात्र, सध्या पाण्याखाली गेलेले हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी नागरिक आणि इतिहास संशोधक या ठिकाणी भेट देताना दिसत आहेत.

हेही वाचा

Back to top button