दहावीच्या परीक्षेसाठी ‘इतके’ टक्के शुल्कवाढ; परिपत्रक प्रसिद्ध | पुढारी

दहावीच्या परीक्षेसाठी 'इतके' टक्के शुल्कवाढ; परिपत्रक प्रसिद्ध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा शुल्कांमध्ये 10 टक्के वाढ केली असून, नवे शुल्क येत्या पुरवणी परीक्षेपासून लागू करण्यात आले आहे. सुधारित शुल्कानुसार नियमित पद्धतीने परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्याला 540, तर तंत्र विषय घेणार्‍या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षेचे जादाचे 100 रुपये भरावे लागेल, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे. राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे वाढता स्टेशनरी खर्च लक्षात घेऊन, परीक्षा शुल्क वाढीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने 10 टक्के शुल्कवाढीला परवानगी दिली. त्यानुसार राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सुधारित शुल्काबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

त्याचप्रमाणे खासगी पद्धतीने परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्याला नावनोंदणी, माहिती पुस्तिका; तसेच परीक्षा शुल्क असे मिळून 1 हजार 880 रुपये भरावे लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (तंत्र विषय) 100 रुपये जादा भरावे लागतील. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 520 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. यात तंत्र विषय असल्यास, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 100 रुपये जादा भरावे लागणार आहेत, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याला 980 रुपये भरावे लागतील. विद्यार्थ्याने तंत्र विषय घेतला असल्यास, त्याला प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 100 रुपये जादा भरावे लागणार आहे. हे सुधारित शुल्क आगामी जुलैची पुरवणी परीक्षा तसेच फेब्रुवारी- मार्च 2025 च्या नियमित परीक्षेसाठी आकारण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

हेही वाचा

Back to top button