धक्कादायक! मैत्रिणींची छायाचित्रे प्रियकराला पाठवायची; तरुणीसह प्रियकरावर विनयभंगाचा गुन्हा | पुढारी

धक्कादायक! मैत्रिणींची छायाचित्रे प्रियकराला पाठवायची; तरुणीसह प्रियकरावर विनयभंगाचा गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी महाविद्यालयातील रूम पार्टनर मैत्रिणींची छायाचित्रे मोबाईलवर काढून प्रियकराला पाठविल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी तरुणीसह तिच्या प्रियकराविरुद्ध माहिती- तंत्रज्ञान कायदा आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. विनीत अजित सुराणा (सध्या रा. हिंजवडी) याच्यासह एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शिवाजीनगर भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात ती राहायला आहे. तरुणी आणि तिच्या तीन मैत्रिणी एकाच खोलीत राहायला आहेत. तरुणीने तिच्या तीन मैत्रिणींची छायाचित्रे मोबाईलवर काढली. तिने तिचा मित्र विनीत याला पाठविली. तिने मोबाईलवर चित्रीकरण केले होते. गेले पाच महिने तरुणी विनितच्या संपर्कात होती. विनितशी ती मोबाईलवर बोलत होती. त्या वेळी तिच्या मैत्रिणीने छायाचित्रे तसेच व्हिडीओबाबत झालेल्या गप्पा ऐकल्या. त्यानंतर मैत्रिणींनी तरुणीच्या मोबाईलमधील छायाचित्रे, व्हिडीओ तपासली.

तेव्हा आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे आढळून आली. त्यानंतर याबाबतची तक्रार अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे देण्यात आली. एका विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रशासनाने छायाचित्रे काढणार्‍या तरुणीला निलंबित केले आहे. आरोपी विनितने तरुणींची छायाचित्रे, व्हिडीओ अन्य कोणाला पाठविली आहेत का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button