Loksabha election | 69. 48 टक्के मतदानावर ठरेल बारामती निकालाचे गणित! | पुढारी

Loksabha election | 69. 48 टक्के मतदानावर ठरेल बारामती निकालाचे गणित!

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा क्षेत्रात टक्केवारीच्या गणितानुसार सर्वाधिक 69. 48 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख 69 हजार 217 मतदारांपैकी 2 लाख 56 हजार 531 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामती लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडी यांचे उमेदवार बारामतीतील होते. त्यामुळे येथे मोठ्या इर्ष्येने मतदान झाले. ही मते कोणाच्या पारड्यात जातात, यावर लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल, असे बोलले जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सहा विधानसभा क्षेत्रातून एकूण 59.37 टक्के मतदान झाले. एकट्या बारामती विधानसभा क्षेत्राचा विचार करता येथे 1 लाख 38 हजार 127 पुरुष, 1 लाख 18 हजार 398 महिला व इतर 6 यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा मतदारसंघात खडकवासल्यात 2 लाख 77 हजार 365 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर बारामतीत 2 लाख 56 हजार 531 मतदान झाले आहे. अन्य चार विधानसभा क्षेत्रांचे मतदान त्या खालोखाल आहे. बारामतीत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जाईल याचे भाकीत वर्तवणे सध्या तरी अशक्य झाले आहे.

बारामती शहरात महायुतीला, तर ग्रामीण भागात महाविकास आघाडीला चांगले मतदान झाल्याचे बोलले जात आहे. बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार अशी घरातच लढाई होती. त्यामुळे ही लढाई प्रचंड गाजली. दोन्ही बाजूंनी निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. बारामती तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने, बारामती दूध संघ, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, बारामती बँक अशा मोठ्या संस्था अजित पवार यांच्या ताब्यात आहेत.

या उलट शरद पवार गटाकडे कोणत्याही मोठ्या संस्था नाहीत. अजित पवार गटाकडून या संस्थांच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली होती. याशिवाय पक्षीय संघटनातही अजित पवार गट शरद पवार गटापेक्षा येथे सरस आहे. भाजप, सेना, रिपाइं व अन्य घटक पक्षांनीही या निवडणुकीत मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी झोकून काम केले. त्याचा फायदा त्यांना होईल, असे बोलले जात आहे. दुसरीकडे ग्रामीण मतदारांनी विधानसभेला दादा, तर लोकसभेला साहेब म्हणतील तसे अशी भूमिका घेतली. परिणामी, ग्रामीण भागात महाविकास आघाडीचा जोर राहिला. ग्रामीण भागातील मतदान गावच्या नेत्यांच्या हाती नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हाती होते. त्यामुळे सर्वसामान्य मतदाराने मतदानातून आपली ताकद दाखवून दिली, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामीणचा अधिकचा कल मविआकडे राहिला असल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय बसपाचीही बारामतीत स्वतंत्र व्होट बँक आहे. त्यांच्याकडेही काही मते वळण्याची शक्यता आहे. एकूण 38 उमेदवारांपैकी काही बारामतीतील स्थानिक उमेदवार होते. मतदानानंतर आता फक्त अंदाज वर्तविण्याशिवाय कोणाच्याच हाती फारसे काही राहिलेले नाही. मतदानाच्या टक्केवारीवरून फक्त अंदाज बांधले जात आहेत. प्रत्यक्षात बारामतीतही ’काटे की टक्कर’ झाली असून, मतमोजणीत याचा प्रत्यय येईल, असे मत सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केले. त्यामुळे बारामतीत झालेल्या एकूण मतदानात कोणाचा किती वाटा हे निकालातूनच स्पष्ट होईल.

हेही वाचा

Back to top button