खेडच्या सह्याद्री स्कूलमध्ये रविवारी रंगणार देशी बियाणे महोत्सव.. | पुढारी

खेडच्या सह्याद्री स्कूलमध्ये रविवारी रंगणार देशी बियाणे महोत्सव..

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : देशातील स्थानिक, देशी वाणांचे बियाणे टिकावे, त्यांची देवाण-घेवाण तसेच संवर्धन व्हावे आणि त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा, या हेतूने खेड तालुक्यातील सह्याद्री स्कूल, मुक्ताई महिला शेतकरी गृहउद्योग गट व समृद्ध सह्याद्री शेतकरी उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 12) सह्याद्री स्कूलच्या आवारात देशी बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या वेळी भाताच्या विविध स्थानिक वाणांसह तृणधान्य व भाजीवर्गीय बियाणे उपलब्ध होणार आहेत.

रविवारी होणार्‍या देशी बियाणे महोत्सवात शेतकर्‍यांना स्थानिक आंबेमोहर, काळा तांदूळ-चकहाव, लाल तांदूळ-कुरुवा, लाल तांदूळ-मुणगा, डायबेटीक राईस तांदूळ-नवारा ब्लॅक हस्क, सफेद तांदूळ-तुळश्या, सफेद तांदूळ-आंबेमोहर (जुन्नर), सफेद तांदूळ-आंबेमोहर (मावळ), सफेद तांदूळ-बासमती (चंद्रपूर), सफेद तांदूळ-चिनोर (चंद्रपूर) आदी भात बियाण्यांसह नाचणी, वरई, बर्टी, राळा व बाजरी, काटेरी वांगी, गावरान टोमॅटो, लाल भेंडी, श्रावणी घेवडा, डबल बी, बांधावरचे वाल, दोडका, घोसाळी, पालक, आंबट चुका, अंबाडी- स्पेशल (भरीव बोंडाची), थाई बेजील, स्वीट बेजील शेंदरी (बिक्सााद्य रंग देणारे), हातगा-स्पेशल (गडद गुलाबी) अशी बियाणे उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या बियाणे महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन देशी बियाणे संवर्धक व समन्वयक, सह्याद्री स्कूल आउटरिच (कृष्णामूर्ती फाउंडेशन) दीपा मोरे यांनी केले आहे.

अनियमित पाऊस व कीटकांच्या हल्ल्यांमुळे संकरित बियाणे टिकाव धरत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. सध्या सर्व शेतकरी एकच बियाणे, एकच वाणाचे (उदा. इंद्रायणी) पीक घेतात. एखादी रोगराई आली तर संपूर्ण परिसरातील भातपीक बाधित होते. परंतु देशी व स्थानिक भात पिकांची लागवड केल्यास कमी-अधिक पावसात ही पिके तग धरून राहू शकतात, असा अनुभव आहे. तसेच देशातील अनेक स्थानिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे पारंपरिक व देशी बियाणे टिकले पाहिजे, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे व ते परिसरातील शेतकर्‍यांपर्यंत पोहचावीत यासाठी कृष्णामूर्ती फौंडेशनचे सह्याद्री स्कूल गेली अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे.

हेही वाचा

 

Back to top button