Loksabha election ! खडकवासल्यात मतदानाचा टक्का घसरला; अवघे 51.55 टक्के मतदान | पुढारी

Loksabha election ! खडकवासल्यात मतदानाचा टक्का घसरला; अवघे 51.55 टक्के मतदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 59.50 टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीपेक्षा दोन टक्के कमी मतदान झाले आहे. ज्या भागात जास्त मतदान होण्याची शक्यता होती तिथे शहरी भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात तुलनेने कमी म्हणजे 51.55 टक्के मतदान झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आणि कोणत्या भागात कोणाचा जोर होता, यावरच हाय व्होल्टेज निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. कमी-जास्त झालेल्या मतदानाचे परिणाम काय होतील, याचीच चर्चा कार्यकर्त्यांत दिवसभर सुरू होती.

निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी बुधवारी बारामती लोकसभा मतदारसंघाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये खडकवासला मतदारसंघात मतदानाची सर्वांत कमी टक्केवारी असली, तरी मतदान केलेल्या मतदारांची सर्वाधिक संख्या या मतदारसंघात आहे. शहरी भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात 51.55 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान 69.48 टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे.

गेल्या वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघात 61.70 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानात 2 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, बारामतीचे मतदान मंगळवारी (दि. 7) पार पडले. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मंगळवारी या मतदारसंघात 56.07 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, यात बदल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सुमारे 24 तासांनी मतदानाची अंतिम आकडेवारी नव्याने जाहीर करण्यात आली आहे.

बारामती मतदारसंघात 23 लाख 72 हजार 668 मतदारांपैकी 14 लाख 11 हजार 621 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. तर 9 लाख 61 हजार 47 मतदारांनी मतदान केले नाही. मतदान केलेल्यांमध्ये 7 लाख 74 हजार 383 पुरुष, 6 लाख 37 हजार 219 महिला व 19 तृतीयपंथींचा समावेश आहे. पुरुषांचे प्रमाण एकूण मतदारांच्या तुलनेत 62.35 टक्के, महिलांचे प्रमाण 56.36 टक्के, तर तृतीयपंथींचे प्रमाण 16.38 टक्के इतके आहे.

खडकवासल्यात सर्वाधिक मतदार

मतदान केलेल्या मतदारांची सर्वाधिक संख्या खडकवासला मतदारसंघात 2 लाख 77 हजार 365 इतकी असून, सर्वांत कमी दौंड मतदारसंघात 1 लाख 83 हजार 658 मतदारांनी मतदान केले आहे. विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी पाहता सर्वाधिक 69.48 टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्याखालोखाल 67.12 टक्के मतदान इंदापूरमध्ये, दौंडमध्ये 60.29 टक्के, भोरमध्ये 60.11 टक्के, तर पुरंदरमध्ये 53.96 टक्के मतदान झाले आहे. सर्वांत कमी मतदान खडकवासला मतदारसंघात 51.55 टक्के झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक

विधानसभा मतदार संघ     एकूण मतदार   झालेले मतदान     टक्केवारी

  • दौंड                                304607          183658              60.29%
  • इंदापूर                            323541           217173              67.12%
  • बारामती                          369217          256531               69.48%
  • पुरंदर                             429351           231679               53.96%
  • भोर                                407921           245215                60.11%
  • खडकवासला                   538031           277365                51.55%

हेही वाचा

Back to top button