झोपडपट्टीवासीयांचा काँग्रेस पक्षच खरा कैवारी; महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचे प्रतिपादन | पुढारी

झोपडपट्टीवासीयांचा काँग्रेस पक्षच खरा कैवारी; महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचे प्रतिपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : झोपडपट्टीवासीयांचा सच्चा कैवारी काँग्रेस पक्षच असून, येथील नागरिकांना सर्व नागरी सुविधा देणे, कॉम्प्युटर प्रशिक्षण, महिला बचत गट, युवा बचत गट यांद्वारे, तसेच स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर मिळावे यासाठी वाल्मीकी-आंबेडकर योजना, बीएसयूपी, राजीव गांधी आवास योजना, एसआरए अशा विविध माध्यमांतून झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचवण्यासाठी काँग्रेसने सदैव प्रयत्न केले व यशही मिळवले. यापुढेही झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचावणे हेच माझे ध्येय असणार आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या वेळी सांगितले.

वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा परिसरात धंगेकर यांनी पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या वेळी अनेक वृद्ध स्त्री-पुरुष नागरिकांनी इंदिरा गांधींबद्दलच्या आठवणी जागवल्या. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी अनेक तक्रारींचा पाढा धंगेकरांसमोर वाचला. गेल्या 10 वर्षांत भाजपचे खासदार या भागात फिरकलेच नाहीत, असे नागरिकांनी सांगितले. तसेच, संपूर्ण परिसराच्या दृष्टीने त्या भागातील राजीव गांधी हॉस्पिटल अपुरे पडते. त्यासाठी नवीन हॉस्पिटलची निर्मिती व्हावी, नवीन शाळा निघाव्यात, समान दाबाने पाणीपुरवठा, कचर्‍याची विल्हेवाट, बेकारी असे अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले.

मी निवडणुकीनंतर खासदार झाल्यावर संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन हे प्रश्न निश्चितच मार्गी लावेन व त्यासाठी केंद्राकडून भरीव विकासनिधीदेखील आणेन, असे धंगेकरांनी आश्वस्त केले. या परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण जास्त असून, येथे झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न मी प्राधान्याने सोडविणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. या पदयात्रेत वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, माजी नगरसेवक संजय भोसले, राजेंद्र शिरसाट, साळवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्वेता चव्हाण, सुनील मलके, विशाल मलके, संगीता देवकर, विल्सन चंदेवळ, येरवडा महिला युवा अध्यक्षा ज्योती चंदेवळ आदी प्रमुख पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा

Back to top button