विद्यापीठात सुरक्षारक्षक टेंडर घोटाळा; सागर वैद्य यांचे विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप | पुढारी

विद्यापीठात सुरक्षारक्षक टेंडर घोटाळा; सागर वैद्य यांचे विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची मंजुरी नसताना खोटी मंजुरी दाखवून सुरक्षारक्षक घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी देऊन टेंडर घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी केला आहे. परंतु विद्यापीठाकडून हा प्रस्ताव नजरचुकीने आला होता. त्यात कुठलाही घोटाळा झालेला नाही असे इतर काही व्यवस्थापन परिषद सदस्य सांगत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विद्यापीठाच्या परिसरात सुरक्षारक्षक नियुक्तीबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठराव सादर करण्यात आला, याबाबत सागर वैद्य यांनी आक्षेप घेतला आहे. त्या संदर्भातील पत्र विद्यापीठाला देण्यात आले होते.

या पत्रावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सर्व उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. मात्र, विद्यापीठाने हा प्रस्ताव मागे घेतल्यामुळे विषय पूर्णपणे संपला होता, असे इतर व्यवस्थापन परिषद सदस्य सांगत आहेत. वैद्य म्हणाले, सुरक्षारक्षक भरतीचा प्रस्ताव सर्वप्रथम 6 मार्च 2024 च्या सभेत ऐनवेळचा प्रस्ताव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी ठेवला होता. नंतर 9 मार्च 2024 च्या सभेत हा प्रस्ताव अजेंड्यावर आणला गेला. या सभेत महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळ आणि मेस्को या कंपन्यांबद्दल पुन्हा वादग्रस्त चर्चा झाली. 6 आणि 9 मार्चला चर्चेला आलेला आणि मंजूर न झालेला हा प्रस्ताव 27 फेब्रुवारीला मंजूर दाखवण्याचा बोगसपणा प्रशासनाने केलाच कसा ? आणि कशासाठी ? असा सवाल आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा

Back to top button