भटकता आत्मा असतो, तसाच वखवखलेला आत्माही : ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका | पुढारी

भटकता आत्मा असतो, तसाच वखवखलेला आत्माही : ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ज्याप्रकारे भटकता आत्मा असतो, तसाच वखवखलेला आत्माही असतो. गुजरातमधील एक-एक वखवखलेला बुभूक्षित आत्मा सध्या महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदाची प्रतिष्ठा घालवत असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर लोकसभा उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ वारजेमध्ये आयोजित सभेत ठाकरे आणि पवार बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, विठ्ठल मणियार, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सचिन अहिर, माजी आमदार मदन बाफना, जगन्नाथ शेवाळे, कुमार गोसावी, चंद्रकांत मोकाटे, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, प्रशांत जगताप, सचिन दोडके आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, ज्या महाराष्ट्रासाठी अनेकांनी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता बलिदान देऊन हौतात्म्य पत्कारले, तोच महाराष्ट्र लुटण्याचे काम आज केले जात असून, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात आहे. मोदी आणि भाजपची कीव

येते. शिवसेनेने कठीण काळी मदत केली. ती शिवसेना आज संपवायला निघाले आहेत. आम्ही सोबत असताना मोदींना फार वेळा महाराष्ट्रात येण्याची गरज भासत नव्हती. आज त्यांना जिल्ह्याजिल्ह्यांत फिरावे लागत आहे. दहा वर्षांत काय काम केले, ते सांगायचे सोडून खालच्या तापळीवरील भाषा वापरली जात आहे. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत, ते मित्रांसाठी काम करीत आहेत. त्यांनी फोनवर शहाच्या मुलाला बीसीसीआयचे अध्यक्ष केले. भ्रष्टाचार कोणी केला आणि क्लीन चिट कोणाला मिळाली, हे जनतेला माहिती आहे. एक अकेला सबसे भारी, सोबत सारे भ्रष्टाचारी, असेही ठाकरे म्हणाले. सेक्स स्कँडल चालविणार्‍याला मोदी मत मागत आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनसंघ आणि भाजप जनसंघ कुठेही नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ आला. मात्र, त्याने संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये फूट पाडली. त्यांचा महाराष्ट्रद्वेश तेव्हापासून आहे. निवडणूक आयोग मोदींचा घरगडी आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्यासाठी त्यांना चारशे पार करायचे आहे. राज्यघटनेला हात लावाल, तर संपूर्ण देश पेटेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. पाशवी बहुमत असतानाही आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवली नाही. जीएसटीच्या माध्यमातून पिळवणूक केली जात आहे. देश काँग्रेसने लुटला की भाजपने? हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र जपणारा पाहिजे की महाराष्ट्र लुटणारा नको आहे. येत्या निवडणुकीत भाजप तडीपार होणार असून, इंडिया आघाडीचे तीनशेपेक्षा खासदार निवडून येणार आहेत. भाजपचे खासदार 300 वरून पुन्हा दोन येतील. मोठी केलेली माणसे सोडून गेली. पण, मोठी करणारी माणसे आमच्यासोबत आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

शरद पवार म्हणाले, देशाचा कारभार कुणाच्या हाती द्यायचा आणि गेल्या दहा वर्षांत ज्यांना सत्ता दिली, त्यांच्या कामाचा आढावा घेणारी निवडणूक आहे. पंतप्रधान या पदाला एक महत्त्व आहे. मात्र, मोदी त्या पदाचे महत्त्व कमी करीत आहेत. मोदी सत्तेचा गैरवापर कसा करतात, याची अनेक उदाहरणे देशासमोर आली आहेत. विरोधात बोलणार्‍यांना तुरुंगात टाकले जात आहे. छत्तीसगडचे, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. राहुल गांधी पदयात्रा काढून देशाचे दुखणे समजून घेत आहेत. त्यांच्यावर टीका केली जात आहे. पदयात्रा काढणे ही चुकीची गोष्ट नाही. त्यांचे वडील राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी हौतात्म्य पत्करले. मात्र, पंतप्रधानांकडून त्या कुटुंबाची नालस्ती केली जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

आपणास बदल करण्याची संधी

मोदींनी 2014 मध्ये मनमोहनसिंगांच्या राज्यात महागाई होती, असे सांगितले. पेट्रोल 71 रुपये लिटर होते. सत्ता आल्यानंतर पन्नास दिवसांत दर खाली आणतो म्हणाले. पण, तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले, दर काय कमी आले नाहीत, उलट वाढलेच. घरगुती गॅसचे दर 410 वरून 1160 वर नेले. त्यामुळे मतदानाला जाताना सिलेडिरला नमस्कार करून जा. हे चित्र बदलण्यासाठी देशात बदल करण्याची गरज आहे, ही संधी आज आपणास मिळत आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले

हेही वाचा

Back to top button