Loksabha Election | पिंपरी-चिंचवडमध्ये 47 हजार 395 मतदारांची भर..! | पुढारी

Loksabha Election | पिंपरी-चिंचवडमध्ये 47 हजार 395 मतदारांची भर..!

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात 25 एप्रिल 2024 पर्यंत झालेल्या मतदार नावनोंदणी मोहिमेत तब्बल 47 हजार 295 मतदारांची भर पडली आहे. शहरातील तब्बल 15 लाख 43 हजार 275 मतदार 13 मे रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील.
मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

23 जानेवारी 2024 पर्यंत झालेल्या नावनोंदणी अभियानात पिंपरी विधानसभेत 3 लाख 64 हजार 806 मतदार होते. 25 एप्रिल 2024 पर्यंतच्या नोंदणी अभियानात मतदार संख्या वाढून 3 लाख 73 हजार 448 इतकी झाली आहे. पुरुष मतदार 4 हजार 224 ने आणि महिला मतदार 4 हजार 416 ने वाढले आहेत. तर, तृतीयपंथी दोन मतदार वाढले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात 5 लाख 95 हजार 408 मतदार होते. 25 एप्रिल 2024 पर्यंत मतदार संख्येत तब्बल 22 हजार 837 ने वाढ झाली आहे. आता एकूण मतदार संख्या 6 लाख 18 हजार 245 इतकी झाली आहे. ती पुणे जिल्ह्यातील सर्वांधिक मतदारसंख्या आहे. पुरुष मतदार 11 हजार 809 ने आणि महिला मतदार 11 हजार 24 ने वाढले आहेत. तर, तृतीयपंथी मतदारसंख्या 4 ने वाढली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील भोसरी विधानसभा मतदार संघात 23 जानेवारी 2024 पर्यंत 5 लाख 35 हजार 666 मतदार होते. त्यात 15 हजार 916 ने वाढ होऊन एकूण मतदार संख्या 5 लाख 51 हजार 582 इतकी झाली आहे. पुरूष मतदारांची संख्या 8 हजार 273 ने आणि महिला मतदारांची संख्या 7 हजार 644 ने वाढली आहे. तर, तृतीयपंथी मतदारांची संख्या एकने घटली आहे.फ

नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान करता येणार

निवडणूक आयोगाने 23 जानेवारी ते 25 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून मतदार नोंदणी अभियान राबविले. नोंदणी झालेल्या नवमतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यासाठी सहाय्यकारी मतदान केंद्र बनविण्यात येणार आहेत. त्या नव्या मतदारांची नावे पुरवणी यादीत येणार आहे, असे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button