Pimpri : रॅप साँगच्या जमान्यात शाहिरीची भुरळ! | पुढारी

Pimpri : रॅप साँगच्या जमान्यात शाहिरीची भुरळ!

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ‘धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर पाजुनी पाणी दुष्ट मुघलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास… जी… जी… जी…!’ अशा प्रेरणादायी पोवाड्यांमधून मराठी शाहिरांनी आपल्या महापुरुषांचा इतिहास जिवंत ठेवला आहे. इतिहासातील प्रेरणादायी पराक्रमांची शाहिरीरूपी गायनाची शहरातील तरुणाईलादेखील भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील आदी उच्चशिक्षित व्यक्तीदेखील उत्स्फूर्तपणे शाहिरी शिकण्यास प्राधान्य देत आहेत. महापुरुषांच्या जयंती व्यतिरिक्तदेखील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातदेखील आता शाहिरांना आमंत्रित केले जात आहे.

हिप हॉप, रॅप साँगच्या जमान्यात शाहिरीची आवड जोपासणार्‍यांना विविध कार्यक्रमात शाहिरी सादरीकरणास बोलावले जात आहे. त्यामुळे करिअरच्यादृष्टीनेही याकडे तरुणाई पाहत आहे. शहरात महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने राज्यातील शाहिरांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या 55 वर्षापासून कार्यरत असलेल्या या परिषदेत राज्याच्या विविध भागातून शाहीर सहभागी झाले होते.

महिला शाहिरी पथक

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांचे शाहिरी पथक कार्यरत आहे. घरची आणि कामाच्या ठिकाणची जबाबदारी सांभाळून या महिला आपली शाहिरी सादरीकरणाची आवड जपत आहेत. शाहिरीद्वारे सामान्यांना इतिहासाबाबत माहिती मिळते.

शाळेतही शाहिरीचे धडे

निगडी-प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शाहिरीचे धडे दिले जात आहेत. महापुरुषांच्या इतिहासामधून प्रेरणा घेत, विद्यार्थ्यांना लहानपणीच सामाजिक क्षेत्रातील आपल्या सहभागाची जाणीव होत आहे. तसेच देशप्रेम, समता, बंधुभाव आदीची भावना त्यांच्यात रुजत आहे.

शाहिरीचा अनेकांना आधार

शाहिरांसोबत वादन करणार्‍या कुटुंबाचा चरितार्थ चालत आहे. यामध्ये संबळ वादक, ढोल-ताशा, पेटी, वीणा, ढोलकी वादक आहेत. त्यामुळे शाहिरीतून अनेकांचे अर्थार्जन चालत असल्याचे दिसून येत आहे.

पोवाड्यांच्या माध्यमातून मुलांमध्ये देशप्रेम जागृत होते. आपल्या इतिहासाविषयी माहिती मिळते. मी स्वतः शिक्षिका असून, शाळांमध्ये इतिहासाच्या तासाला पोवाड्यांचे प्रशिक्षण देतो.

– शितल कापशीकर, शिक्षिका, चिंचवड.

हेही वाचा

Back to top button