कात्रज घाटात कचराच कचरा! दुर्गंधीमुळे प्रवासी त्रस्त | पुढारी

कात्रज घाटात कचराच कचरा! दुर्गंधीमुळे प्रवासी त्रस्त

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या कात्रज घाटात कचरा आणि राडारोड्याचे ढीग साचल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून कात्रज घाटाची स्वच्छता केली जात असली, तरी कचरा कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी कचरा व राडारोडा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांनी घाटात कचरा टाकू नये, यासाठी महापालिकेने कर्मचार्‍याची नेमणूकही केलेली असताना घाटात कचरा टाकण्याचे प्रकार बंद झालेले नाहीत. या ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे.

त्यानुसार कचरा टाकणार्‍यांना जागेवर पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, घाटात रात्रीच्या वेळी कचरा व राडारोडा आणून टाकण्यात येत आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रवासी व परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हॉटेलमधील टाकाऊ अन्न, बांधकामाचा राडारोडा, थर्माकॉल, प्लास्टिकसारखा कचरा रात्रीच्या वेळी घाटात आणून टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच राडारोड्यातील माती, दगड व विटा रस्त्यावर येत असल्याने दुचाकी घसरून अपघातही होत आहे. रात्रीच्या वेळी घाटात पोलिसांची गस्त असते. त्यामुळे पोलिसांनीही घाटात कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

कात्रज घाट परिसरात सध्या ठिकठिकाणी कचरा व राडारोडा साचल्याने वन्यजीवांसह पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. तसेच नागरी आरोग्यास देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

– विक्रम भिलारे, माजी उपसरपंच, भिलारेवाडी

कात्रज घाटाची स्वच्छता आरोग्य विभागाकडून केली जाते. मात्र, रात्रीच्या वेळी या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. काही व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याबाबत अधिक कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

– प्रमोद ढसाळ, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

Back to top button