70 टक्क्यांहून अधिक कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना ‘शॉक शिफ्ट’ची समस्या! | पुढारी

70 टक्क्यांहून अधिक कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना ‘शॉक शिफ्ट’ची समस्या!

कॅलिफोर्निया : ऑफिसमधील बदलांमुळे येणारे नैराश्य म्हणजे शॉक शिफ्ट. हे बदल नोकरी बदलल्याने नवीन ऑफिसमध्ये जुळवून घेतानाचे असू शकतात किंवा त्याचप्रमाणे त्या ऑफिसमध्येच होणारे धोरणात्मक बदल देखील असू शकतात. सध्या कॉर्पोरेट जगतात 70 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांना अशा शॉक शिफ्टने ग्रासले असल्याचे एका आकडेवारीतून दिसून आले आहे.

लिंक्डइन’च्या आकडेवारीनुसार सर्वसामान्यपणे कोणताही कर्मचारी 4.2 वर्षांनंतर नोकरी बदलतो. नवीन कंपनीमध्ये नव्या जबाबदारीसह एखादी व्यक्ती रूजू होते, त्यावेळी सुरुवातीचा काही काळ दिशाहीन झाल्यासारखे भासू शकते. सध्याची पिढी कोणत्याही अनुभवाशिवाय नवीन जबाबदार्‍या स्वीकारण्यास तयार असते. अशा नोकर्‍यांना ते अगदी ड्रीम जॉबही म्हणतात. अनेकदा अपेक्षित कामापेक्षा वेगळेच काम आपल्याला करावे लागत असल्याची भावनाही ‘शिफ्ट शॉक’साठी करणीभूत ठरते.

बर्‍याच ठिकाणी कंपन्यांनी दिलेली चुकीची माहिती, कंपनीच्या अपेक्षा आणि नव्याने रूजू झालेल्या कर्मचार्‍यांच्या अपेक्षांमधील तफावत, कामासंदर्भातील तडजोडी, कंपनीतील कामाची पद्धत, अपेक्षित सकारात्मक बाबींबद्दल हाती आलेली निराशा, कुरघोडीचे राजकारण असलेले कार्यालयीन वातावरण यासारख्या गोष्टींमुळे अनेकांना ‘शिफ्ट शॉक’चा त्रास होतो. मूस सर्वेक्षणामधील आकडेवारीनुसार, कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांपैकी जवळपास 70 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांना त्यांच्या कारकिर्दीत कधी ना कधी ‘शिफ्ट शॉक’चा त्रास जाणवला आहे.

‘शिफ्ट शॉक’चा त्रास होऊ नये म्हणून बरेच काही करता येण्यासारखे असते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, नवीन ठिकाणी कामावर रूजू होत असल्यास सतत जुन्या गोष्टींशी नव्या ठिकाणाची, कंपनीच तुलना करणे टाळावे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नव्या कंपनीकडे नवीन संधी म्हणून पहावे. नोकरी बदलून चूक केली आहे, आपली पुढली वाट बिकट आहे, असे नकारात्मक विचार करू नये. तसेच नव्या ठिकाणी उत्साहाने काम करा. तेथील सहकार्‍यांशी जुळवून घेण्याचा, गरज पडेल तिथे न घाबरता त्यांची मदत मागण्याची तयारी ठेवावी. असे केल्यास शिफ्ट शॉकची तीव्रता बरीच कमी केली जाऊ शकते.

Back to top button