

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी-फाइव्ह नाइन रस्ता सिमेंटचा करण्यासाठी सध्या खोदकाम सुरू असल्याने जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पाणीटंचाईच्या दिवसांत पाण्याचा अपव्यय होत असून, पाणीपुरवठाही विस्कळीत होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, रविवारी जलवाहिनी फुटल्याने होणारा पाण्याचा अपव्यय जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला.
विद्यानगर येथील गल्ली क्रमांक चार व पाचमध्ये रविवारी सकाळी दोन ठिकाणी पाणीगळती होत होती. रस्त्यावर पंधरा ते वीस फुटांचा पाण्याचा फवारा उडत होता. यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात होते. गल्ली क्रमांक चार येथील वळणावर फुटलेली जलवाहिनी तर एक फूटभरही खोल गाडलेली नाही. जलवाहिनी इतक्या कमी खोलीवर कशी गाडली गेली, याबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.
स्थानिक रहिवासी कपिल गायकवाड यांनी रविवारी सकाळी जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याची माहिती दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीला दिली. त्यानंतर दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे यांना पाण्याचा अपव्यय होत असल्याचे कळविले. त्यानंतर कनिष्ठ अभियंता केतन जाधव यांनी पाणीगळती होत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाणीपुरवठा बंद केल्याने पाण्याचा अपव्यय टळला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जलवाहिनी असमान खोलीवर गाडली गेलेली आहे. काही ठिकाणी रस्त्याला समांतर, तर काही ठिकाणी आडव्या जलवाहिन्या आहेत. त्यामुळे खोदकाम करताना जलवाहिनी लक्षात येत नाही. रविवारी फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली आहे.
– तुषार माने, ठेकेदार
हेही वाचा