सारसबाग फूड प्लाझाला ब्रेक! नेमकं कारण काय? | पुढारी

सारसबाग फूड प्लाझाला ब्रेक! नेमकं कारण काय?

पुणे : सारसबाग चौपाटीचा पुनर्विकास करून तेथे दुमजली फूड प्लाझा उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या संदर्भातील 19 कोटी रुपयांच्या पूर्वगणन प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मात्र, माजी आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यकाळात वेग घेतलेल्या या प्रस्तावाला नवीन आयुक्त आल्यानंतर ब्रेक लागला आहे. निविदेचा प्रस्ताव अतिक्रमण विभागाने तयार केला आहे. मात्र, त्याला नवीन आयुक्तांचा हिरवा सिग्नल मिळत नाही. त्यामुळे याबाबत अतिक्रमण विभागाचे अधिकारी काहीही न बोलता तोंडावर बोट ठेवणे पसंद करत आहेत

ऐतिहासिक सारसबाग पुण्यातील आणि पुण्याबाहेरील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथील खाद्यपदार्थांची चव चौपाटी बागेत येणार्‍या आबालवृद्धांसह अस्सल खवय्यांना कायमच खुणावते. त्यामुळे या परिसरात पार्किंग आणि अतिक्रमणांचा प्रश्न वारंवार उद्भवतो. दुसरीकडे व्यावसायिकांनी महापालिकेची परवानगी न घेताच दुकाने दुमजली केली आहेत. त्यामुळे येथील स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनेकवेळा कारवाई केली जाते. या पार्श्वभूमीवर पर्यटक व व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने येथील चौपाटीचा चांगल्याप्रकारे विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विकास आराखडाही तयार करण्यात आला. हा फूड प्लाझा भवन विभागाने करायचा की अतिक्रमण विभागाने याचा निर्णय होत नव्हता.

याशिवाय या स्टॉलची रचना कशी असावी, याचाही निर्णय होत नव्हता. मध्यंतरी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी गुरूग्राम येथे जाऊन तेथील दुमजली फूड प्लाझाची पाहाणीदेखील केली होती. अखेर याबाबतचा प्रस्ताव पूर्वगणन समितीसमोर सादर होऊन 19 कोटी 22 लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यासंबंधीच्या प्रस्तावास मान्यता चार दिवसांत मिळेल, असे अधिकार्‍यांकडून सांगितले जात होते. मात्र, आयुक्त विक्रम कुमार यांची बदली होऊन त्यांच्या जागी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली. नवीन आयुक्तांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, त्यांनी यावर अद्याप काहीच निर्णय केलेला नाही. अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यानंतर ते कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत. रस्ता बंद करण्यावर किती हरकती व सूचना आल्या याची संख्याही सांगत नाहीत.

पार्किंगसाठी सुधारित आराखडा

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सारसबागेच्या फूड प्लाझासाठीचा आराखडा तयार केला होता. परंतु, येथे 200 वाहने पार्क होऊ शकतील अशी व्यवस्था करण्याची सूचना पूर्वगणन समितीच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार आता या पार्किंगचा समावेश करून सुधारित आराखडा तयार केला जाईल. त्यामुळे या प्लाझासाठीच्या खर्चात वाढ होईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

असा असेल फूड प्लाझा

तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार या प्लाझामध्ये तळमजल्यावर सध्याचे 54 स्टॉल्स, तर वरच्या मजल्यावर 24 असे एकूण 78 स्टॉल्स असतील. वरच्या मजल्यावर व्यापारी गाळे उभारले जाणार असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फूड चेन्सच्या फ्रॅचायझींनाही संधी दिली जाणार आहे. सारसबागेकडील बाजूला मुलांना खेळण्यासाठी जागा ठेवली जाईल. त्यानंतर साडेआठ मीटर रुंदीचा वॉकिंग प्लाझा असेल. तर सणस मैदानाकडील बाजूस दहा मीटर जागेत फूड प्लाझा उभारला जाईल. तर यावर सोलर पॅनेल असेल. याशिवाय ग्राहकांना बसण्यासाठी व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बैठक व्यवस्थाही असेल. या फूड प्लाझामुळे सध्याचा पेशवे उद्यान ते बाजीराव रस्ता हा रस्ता बंद केला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने नागरिकांकडून हरकती व सूचनाही मागवल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button