Meena Chandavarkar : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांचे वृद्धापकाळाने निधन | पुढारी

Meena Chandavarkar : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

पुढारी वृत्तसेवा : Meena Chandavarkar : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पुण्यातील अभिनव विद्यालय तसेच न्यू इंडिया स्कूल या शाळांच्या इंग्रजी माध्यम विभागाच्या माजी विभागप्रमुख मीना चंदावरकर (वय 85) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने आणि अल्प आजाराने निधन झाले.
मीना चंदावरकर यांचे शालेय शिक्षण कोकणात आणि कॉलेजचे शिक्षण वाडिया कॉलेज पुणे येथे झाले. त्यांनी 1973 मध्ये अभिनव विद्यालय शाळेच्या इंग्रजी माध्यम विभागाची सुरुवात केली. 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नवे प्रयोग केले. राज्य सरकारच्या पहिलीपासून इंग्रजी या प्रकल्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.शाळेतील काचणार्‍या गोष्टी टाळून मुलांना समृद्ध करणारे अनुभव अखंड देत राहणे, त्यांचा विकास घडविणे, मुलांच्या आयुष्यात शाळा ही रम्य आठवणींची साखळी ठरावी, या तत्त्वावर विश्वास ठेवून चंदावरकर यांनी शिक्षणक्षेत्रात योगदान दिले. आधुनिक बालमानसशास्त्राच्या आधाराने त्यांनी अनोखे उपक्रम राबविले.
अक्षरे, आकडे शिकण्याबरोबर साहित्य, संगीत, चित्रकला अशा विषयांना त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले. पुण्यातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी तीस वर्षे काम केले. त्यानंतर न्यू इंडिया शाळेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले. प्रयोगशील शिक्षिका, बालविकासासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण कल्पना, पद्धतींचा उपयोग करण्यासाठी त्यांचा नावलौकिक होता. अनोख्या पद्धतींचा वापर करून राज्यभरातील शिक्षकांना इंग्रजीच्या अध्यापनाचे शिक्षण त्या द्यायच्या. राज्य सरकारच्या पहिलीपासून इंग्रजी या प्रकल्पाचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Back to top button