लोकसभेच्या निकालावर विधानसभेची गणिते! शिरूरमध्ये विधानसभा इच्छुकांमध्ये संभ्रम वाढला | पुढारी

लोकसभेच्या निकालावर विधानसभेची गणिते! शिरूरमध्ये विधानसभा इच्छुकांमध्ये संभ्रम वाढला

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचंड राजकीय घडामोडी व उलथापालथ सुरू आहे. यामध्ये यात या पक्षातून त्या पक्षात, महाविकास आघाडीतून महायुती व महायुतीतून महाविकास आघाडीत प्रवेश करणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. परंतु, हे सर्व पक्षप्रवेश व राजकीय घडामोडी लोकसभेच्या उमेदवारांच्या विजयासाठी नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन सुरू आहेत. विधानसभेची ही गणिते शिरूर लोकसभेचा निकाल बिघडविणारी तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आंबेगाव तालुक्यातील शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांतील महायुतीच्या आमदारांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खासदारांनी आमदारांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही, असा शब्द देखील अजित पवार यांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आपले राजकीय भवितव्य पणाला लागू शकते, याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच पक्षांतील विधानसभा इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसत आहे. खेड तालुक्यातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी पाच दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला. देशमुख यांच्या पक्षप्रवेशाचे पडसाद महाविकास आघाडीत उमटताना दिसत आहे. खेड तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते नाराज झाले असून, याचा कोल्हे यांना फटका बसू शकतो. याशिवाय गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खेड तालुक्यातील शरद पवार गटाची सर्व धुरा सांभाळणारे व विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करणारे सुधीर मुंगसे यांच्या तयारीवर देखील देशमुख यांच्या प्रवेशाने पाणी फिरू शकते. यामुळे आता मुंगसे देखील कोल्हे यांचे काम करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जुन्नर तालुक्यात देखील हीच परिस्थिती असून, डॉ. अमोल कोल्हे काँग्रेसचे नेते व विधानसभा इच्छुक उमेदवार साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना फारच उचलून धरत असून, जुन्नर; श आमदार महाविकास आघाडीचाच असेल, असे जाहीर वक्तव्य करीत आहेत. यामुळे जुन्नर तालुक्यातील ’उबाठा’ गटाचे नेते व कार्यकर्ते देखील कोल्हे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.
हीच परिस्थिती शिरूर विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळत आहे. यामुळेच सध्यातरी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेची गणिते लोकसभेचा निकाल बिघडवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Back to top button