साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या प्रसाधनगृहाचा शोध! पुरातत्व विभाग व डेक्कन कॉलेज टीमचे संशोधन | पुढारी

साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या प्रसाधनगृहाचा शोध! पुरातत्व विभाग व डेक्कन कॉलेज टीमचे संशोधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हरियाणातील राखी गढी येथे हडप्पा संस्कृतीमधील सर्वांत पुरातन वसाहतीच्या उत्खननात मोठे यश आले असून, तब्बल साडेचार हजार वर्षांपूर्वाचे प्रसाधनगृह मातीच्या लोट्यासह सापडले आहे. तसेच या ठिकाणी तेवढाच जुना मानवी सांगाडा सापडला आहे. राखी गढी येथे गेल्या काही वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली, पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील संशोधक काम करीत आहेत. या पूर्वी तेथे साडेचार हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी सापडली होती. तसेच एका भांड्यात दुधाचे अवशेष सापडले होते. त्यानंतर तेथील उत्खननात आता प्रथमच संपूर्ण प्रसाधनगृहच सुस्थितीत आढळले. त्यात एक लोटा आणि मानवी सांगाडाही सापडला आहे.

त्या काळातही होते स्टेडियम

गेल्या काही महिन्यांपासून राखी गढीत शास्त्रज्ञ दिवसरात्र काम करीत आहेत. पावसाळ्यात खोदकाम करणे अवघड होते म्हणून हिवाळा अन् उन्हाळ्यात हे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीच्या खोदकामात हडप्पा काळातील काही बहुमजली इमारतींचे अवशेष सापडले. हे पुरावे अगदी लहान क्षेत्रात सापडले आहेत. अजूनही मोठमोठे ढिगारे शिल्लक आहेत. पुरातत्व विभागाचे प्रमुख संजय मंजुळ आणि त्यांच्या टीमला दोन्ही बाजूंनी स्टेडियमचे पुरावे सापडले आहेत. तसेच वेशीजवळ टेराकोटा बॉलचे ढीग सापडले आहेत. हे हल्लेखोरांविरुद्ध गोफणासाठी वापरले होते का, यावर संशोधन सुरू आहे.

शौचालय अन् मानवी सांगाडा

या भागात दोन दिवसांपूर्वींच मानवी सांगाडा सापडला आहे. तसेच, 4 हजार 500 वर्षांपूर्वीचे प्रसाधनगृहही सापडले आहे. एका खोल खंदकात सहा मीटर खोदल्यावर मातीची भांडीही सापडली आहेत. पाणी साठवण्याच्या डब्यात अजूनही एक लोटा जसाच्या तसा सापडला आहे.

हेही वाचा

Back to top button