

मॉस्को : या भौतिक जगतात 'पदं पदं यत विपदं' म्हणजेच पावलोपावली संकटं आहेत असे आपल्याकडे म्हटले जाते, ते खरेच आहे. कधी कोणता प्रसंग येईल हे काही सांगता येत नाही. रशियाच्या एका पत्रकार महिलेलाही याचा नुकताच अनुभव आला. तिने पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. या पोशाखाचा तेथील पोलिसांनी भलताच अर्थ काढून तिचा संबंध युक्रेनशी जोडला व त्यामुळे तिला चौकशीला सामोरे जावे लागले!
इंटोनिडा स्मोलिना असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. 38 वर्षांच्या स्मोलिनाने कधी विचारही केला नव्हता की तिच्या कपड्यांच्या रंगामुळे पोलिस तिची चौकशी करतील! वेलीकी उत्सयुग येथे राहणार्या या महिलेला सोशल मीडियात पोस्ट केलेल्या तिच्या फोटोतील कपड्यांच्या रंगामुळे पोलिसांचा फोन आला. या फोटोत ती निळ्या आकाशाखाली पिवळ्या रंगाचे कपडे घालून उभी असताना दिसत होती. या फोटोवरून वॅलरी पी नावाच्या एका व्यक्तीने स्मोलिनाविरुध्द तक्रार केली.
या तक्रारीमध्ये असे नमूद करण्यात आले होते की, हा फोटो पोस्ट करून तिने युक्रेनच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. युक्रेनच्या राष्ट्रध्वजात निळा आणि पिवळा हे रंग असतात. या फोटोचा संबंध या सुपीक डोक्याच्या माणसाने युक्रेनच्या ध्वजाशी जोडला. ती प्रतिस्पर्धी देशाच्या प्रतीकांचे समर्थन करीत असल्याचा आरोप ठेवण्यात आला. मात्र, स्मोलिना यांनी चौकशीवेळी आपल्या पोशाखाचा रंग युक्रेनच्या ध्वजातील पिवळ्या रंगासारखा नसून तो क्रायोला रंगाचा असल्याचे सांगितले. अधिकार्यांनीही हे प्रकरण फार न वाढवण्याचा सुज्ञपणा दाखवला व इथेच चौकशी थांबवली!