LokSabha Elections | मोदींची वक्रद़ृष्टी झाली, तर.. : मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका | पुढारी

LokSabha Elections | मोदींची वक्रद़ृष्टी झाली, तर.. : मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविडच्या काळात देशवासीयांसाठी काम करत असताना काही जण घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते, तेच आता पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहेत. मोदींची वक्रदृष्टी झाली तर फेसबुक लाईव्ह करणार्‍यांच्या तोंडाला फेस यईल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात महायुतीच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला, या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर, पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ,

शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आ. सुनील टिंगरे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अहंकारामुळे मधल्या काळात भाजप-शिवसेना युती तुटली होती. मात्र, आम्ही अहंकाराला बाजूला करून पुन्हा ही युती जोडली. त्यानंतर अजितदादांनी युती भक्कम केली. आता मनसेनेही पाठिंबा दिला आहे. संपूर्ण देशात मोदी लाट असून मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे, हे लोकांनी ठरवले आहे. गेल्या पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसला जे काम जमले नाही, ते दहा वर्षांत मोदींनी केले. आज जगात भारताची मान मोदींमुळे उंचावली आहे. देशात 2014 पूर्वी घोटाळे पहायला मिळत होते. आज मात्र सर्वत्र विकास पर्व सुरू आहे. बाळासाहेबांचे राम मंदिर आणि कलम 307 हटवण्याचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले.

ज्या प्रकारे प्रभू रामासाठी पुण्यातून वस्त्र पाठविण्यात आली तशाच प्रकारे मतांची वस्त्रे विणून आपणास दिल्लीला पाठवायची आहेत. पैलवान असल्याने निवडणुकीचा आखाडा मुरलीधर मोहोळ जिंकणारच आहेत. स्वार्थासाठी आखाडा बदलणारा पैलवान या पैलवानापुढे टिकणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अजित पवार म्हणाले, नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या मनात मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करणे हेच आहे. संविधान बदलणार, हे धांदात खोटे आहे. नेहरूंपासून आजवर अनेक वेळा घटनेत बदल करण्यात आला, हे आपण लोकांना सांगितले पाहिजे. तुमच्या माझ्या घरचे लग्न नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवरील रुसवे-फुगवे दूर करून आपण विरोधकांना धूळ चारायची आहे. ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम आहे.

या निवडणुकीनंतर पुन्हा आपणास राज्यात महायुतीचे राज्य आणायचे आहे. काही गोष्टींचा विपर्यास करून विरोधकांकडून गैरसमज पसरवले जातील. विरोधकाला कोणीही कमजोर न समजता आपण मतदारांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. मतभेद असतील तर ते सामंजस्याने दूर करता येतील. निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षातून कोणी दुसरीकडे जाणार नाही, कोणी दगाफटका करणार नाही याची काळजी घेऊ. काही जागांबाबत असलेला तिढा लवकरच सुटेल, असेही पवार म्हणाले. या वेळी डॉ. नीलम गोर्‍हे, प्रा. मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर, धीरज घाटे, नाना भानगिरे, संजय सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यकर्त्यांमुळेच आपला उमेदवार पडेल : पाटील

माझा फोटोच लहान वापरला, माझे नाव टाकले नाही, मला निरोप मिळालेला नाही, असे म्हणून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमुळेच महायुतीचा उमेदवार पडेल. महायुतीचा कार्यकर्ता निष्क्रिय झाला तरच आपला पराभव होईल. त्यामुळे आपण आपली ताकद वापरणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या उमेदवारांचा पराभव होणार नाही. मोदींनी केलेले काम, कोविडमध्ये आपल्या उमेदवारांनी केलेले काम, यावर आपण निवडणूक जिंकू शकतो, असे मत या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

‘उडत गेला म्हणू नका, नाहीतर उमेदवार पडेल’

निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्यानंतर काही जण तक्रारी करत असतात. अशा वेळी त्या तक्रारी शांतपणे ऐकून घ्या. रागाने त्याला तू गेला उडत म्हणू नका, तुमच्या अशा बोलण्यामुळे आपला उमेदवार पडेल, आपल्या बोलण्यातून सत्तेचा माज आहे, असे वाटू देऊ नका. प्रवक्त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये व कृती टाळावी, बोलण्यामुळे मते घटणार नाहीत, तसेच आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन या वेळी अजित पवार यांनी केले.

हेही वाचा

Back to top button