नागपूर : कोराडी देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना फराळाच्या पदार्थातून विषबाधा | पुढारी

नागपूर : कोराडी देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना फराळाच्या पदार्थातून विषबाधा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील श्री जगदंबा महालक्ष्मी मंदिरातील कर्मचाऱ्यांना शिंगाडा,राजगिरा पिठापासून बनविलेल्या उपवासाचे पदार्थ, फराळाच्या माध्यमातून विषबाधा झाल्याने खळबळ माजली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या कोराडी देवी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष आहेत. कोराडी देवी मंदिरातील सुमारे 30 कर्मचारी व काही जणांना अन्नातून ही विषबाधा झाल्याची माहिती मिळाली, या सर्वांना नजोकच्या रुग्णालयात नेण्यात आले. यातील 4 जण गंभीर असल्याने नंदिनी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले तर इतरांना सुटी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या देवीचे चैत्र नवरात्र सुरू असल्याने संबंधितांचे नातेवाईक, भविकांमध्येही बराच वेळ हा नेमका प्रकार कसा झाला हे सांगण्यात न आल्याने गोंधळ वाढला. दरम्यान, फराळातून अतिशय मामुली स्वरूपाचे फूड पॉईझनिंग झाले. तातडीने आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपचार केले. सगळेच सुखरूप आहेत. प्रकृती उत्तम आहे. यातील काही कर्मचारी कामावरही परतले आहेत अशी माहिती ‘पुढारी’शी बोलताना व्यवस्थापनातर्फे श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर, कोराडी देवस्थान व्यवस्थापकानी दिली.

Back to top button