हिंजवडीत आढळला ब्रिटिशकालीन बॉम्ब.. | पुढारी

हिंजवडीत आढळला ब्रिटिशकालीन बॉम्ब..

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुलाच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळला. हिंजवडी पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला असून संरक्षण विभागाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. माण-म्हाळुंगे रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पीएमआरडीए हद्दीत माण-म्हाळुंगे रस्त्यावर ब्ल्यूरिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पुलाचे काम सुरू आहे. बुधवारी (दि. 3) पोकलेन मशिनच्या साह्याने खोदकाम सुरू असताना बॉम्ब आढळला. पीएमआरडीए अधिकार्‍यांनी याबाबत पोलिसांना दिली.

हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी ब्रिटिश काळात तोफेत वापरण्यात येणारा बॉम्ब असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बॉम्ब सुरक्षित ठेवला आहे. याबाबत संरक्षण विभागाशी संपर्क साधला आहे. हा बॉम्ब सुरक्षितपणे संरक्षण विभागाकडे देण्यात येणार आहे. संरक्षण विभागाकडून त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे पोलिसांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. यापूर्वी दिघी, हिंजवडी, वाकड, देहूरोड भागात ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

बॉम्ब सापडल्यानंतर तो सांभाळण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात. न्यायालय अनेक बाबींची चाचपणी केल्यानंतर लष्कराच्या मदतीने बॉम्बची विल्हेवाट लावण्याची परवानगी देते. न्यायालयासोबतच जिल्हाधिकार्‍यांची देखील यासाठी संमती लागते. पोलिसांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडेदेखील पाठपुरावा करावा लागतो.

हेही वाचा

Back to top button