Loksabha election 2024 | शेतकर्‍यांच्या समस्यांवर उपाययोजना होणार का? | पुढारी

Loksabha election 2024 | शेतकर्‍यांच्या समस्यांवर उपाययोजना होणार का?

आबाजी पोखरकर

पिंपरखेड : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रचाराची राळ उडाली आहे. सध्या कडक उन्हाचा चटका आणि त्याबरोबरच वाढलेले पाणी टंचाईचे संंकट, त्यातच विजेचे अतिरिक्त भारनियमन यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कडक उन्हाळा पुढे असताना त्याची चाहूल आताच जाणवू लागल्याने पुढील महिन्यात शेतकर्‍यांना नैसर्गिक वातावरणामुळे निर्माण होणार्‍या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. अशावेळी लोकसभा निवडणूक प्रक्रिया, प्रचारात मग्न असलेले उमेदवार, तसेच सत्ताधारी व विरोधी राजकीय नेत्यांकडून शेतक-यांच्या समस्यावरउपाययोजना होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल बाजारभावाने शेतकरी आर्थिक संकटात सापडून कर्जाच्या खाईत ढकलत चालला आहे. मोठ्या अपेक्षेने कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी काबाडकष्ट करून प्रतिकूल वातारणातही पिकाचे योग्य व्यवस्थापन करून यशस्वी उत्पादन शेतकर्‍यांनी घेतले. शेतकर्‍यांच्या हितासाठी शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने शेतकर्‍यांना मालाला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी घेतलेल्या अनेक पिकांचा उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मार्चपासूनच शेतकर्‍यांना कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत.

आता एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांना आहे. अगोदरच्या थकीत कर्जाच्या बोजात अडकलेल्या शेतकर्‍यांची बँका, सोसायट्या, खासगी सावकार यांच्या तगाद्याने डोकेदुखी वाढली आहे. एप्रिलमधील कडक उन्हाच्या झळांनी पिकाच्या पाण्याची समस्या अधिकच वाढली आहे. कडक उन्हाचा चटका अधिकच वाढल्याने पिकांना पाणी दिल्यानंतर दोन दिवसांमध्ये पुन्हा पाणी गरजेचे बनले आहे. शेतामधील भालेभाज्या, फळभाज्या तसेच इतर तरकारी माल व कांदा पिकाला सध्याच्या कडक उन्हाचा चटका अधिकच बसत आहे. कडक उन्हाचा पारा अधिकच वाढल्याने पिकांची तहान भागविणे अवघड होऊ लागले आहे.

त्यातच कडक उन्हाच्या चटक्यामुळे विजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. अधिक तापमानामुळे ट्रान्सफार्मर खराब होतात, त्यानंतर दुसरा ट्रान्सफार्मर येईपर्यंत पिके जगवायची कशी? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यात अतिरिक्त भारनियमनाची भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कडक उन्हाळा पुढे असताना त्याची चाहूल तीव्रतेने जाणवू लागल्याने शेतकर्‍यांच्या सध्याच्या या समस्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याने पिकांचे नियोजन व भांडवल गुंतवणूक, हवामान बदलाचा अंदाज पाहता शतकर्‍यांना पुढील काही महिने नैसर्गिक वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे जाणकरांचे मत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात शेतकर्‍यांच्या समस्याही तीव्र होणार असल्याने राजकीय नेते, उमेदवार यांना ऐन कडक उन्हाळ्यात शेतकर्‍यांना सामोरे जाताना घाम फुटणार हे निश्चित.

चार्‍याचा प्रश्न अन् बिबट्यांची भीती

पिंपरखेड, काठापूर, जांबूत, चांडोह, फाकटे, वडनेर या बेट भागातील विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी खालवली आहे. नदीवरील बंधार्‍यांमध्ये पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पुढील काळात जनावरांच्या हिरव्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून वाळलेला चारा उपलब्ध नसल्याने पशुधन वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. त्यातच परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकर्‍यांसाठी धोक्याचे ठरू लागले आहे.

हेही वाचा

Back to top button