वरळीत 38 लाखांची विदेशी दारू पकडली

वरळीत 38 लाखांची विदेशी दारू पकडली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : चारचाकी वाहनातून विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या सतीश शिवलाल पटेल (38) याला वरळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन अटक केली. त्याच्याकडून चारचाकी वाहनातील विदेशी मद्य व अंधेरी (पश्चिम) येथे छापा टाकून विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या असा एकूण सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती शिवडी येथे झालेल्या कार्यालयात मुंबई शहर विभागाने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित बातम्या 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके कार्यरत आहेत. या पथकाला चारचाकी वाहनातून परदेशात निर्मित केलेली व दिल्लीतून आयात केलेले विदेशी मद्य वरळीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे ससमिरा मार्गावर एका हॉटेल समोर पथकाने पाळत ठेवली. त्यावेळी चारचाकी वाहनातून येत असलेला संशयित सतीश याला पथकाने पकडले. त्याच्या वाहनात विविध ब्रॅन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या व इतर साहित्य असा सुमारे 22 लाख 89 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. तो पथकाने जप्त केला.

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अंधेरी (पश्चिम ) येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे आणखी मुद्देमाल असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने याठिकाणी छापा टाकून विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या असा सुमारे 14 लाख 39 हजार 160 रुपये किंमतीचा आणखीन मुद्देमाल मिळून आला.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अ.व.द.) प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, मुंबई शहर अधीक्षक प्रविणकुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश काळे, दुय्यम निरीक्षक प्रज्ञा राणे, लक्ष्मण लांघी आदींनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news