Loksabha election : मराठा समाजाच ठरलं ! बारामती लोकसभेसाठी देणार उमेदवार | पुढारी

Loksabha election : मराठा समाजाच ठरलं ! बारामती लोकसभेसाठी देणार उमेदवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार बारामतीत मराठा क्रांती मोर्चाची बैठक मंगळवारी (दि. 26) पार पडली. या बैठकीत इतर तालुक्यांतील पदाधिकार्‍यांशी चर्चा करीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातही यंदा कधी नव्हे एवढी चुरशीची निवडणूक होत आहे. त्यातच गेले काही महिने मराठा आरक्षणाचा मुद्दा कमालीचा तापला आहे. एकीकडे मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी ठाम असताना राज्य शासनाने स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले आहे. सरकारचे हे आरक्षण टिकणार नाही, अशी भीती समाजाला आहे.

त्यामुळे आरक्षणाचा लढा समाजाने अद्याप थांबविलेला नाही. मराठा समाजाकडून लोकसभेला राज्यात उमेदवार दिले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामतीतही जिजाऊ भवन येथे समाजाची बैठक पार पडली. मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार मराठा समाजाकडून बारामती लोकसभेसाठी उमेदवार दिला जाणार असून, त्याबाबतची चर्चा बैठकीत झाली. इतर तालुक्यांतील समाजबांधवांशी चर्चा करून तोडीस तोड उमेदवार दिला जाईल. समाजाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम ताकदीने केले जाणार असल्याचे या बैठकीत ठरविले गेले. मनोज जरांगे यांच्याकडून यासंबंधी वेळोवेळी ज्या सूचना येतील, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असेही निश्चित केले.

हेही वाचा

Back to top button