Lok Sabha Election 2024 : सोलापूर : दुरंगी की तिरंगी

Lok Sabha Election 2024 : सोलापूर : दुरंगी की तिरंगी
Published on
Updated on

सोलापूर : महाविकास आघाडीकडून सोलापूर शहर मध्यच्या आ. प्रणिती सुशीलकुमार शिंदे, महायुतीकडून माळशिरसचे आ. राम सातपुते यांच्यामुळे सोलापूर लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत होणार, असे चित्र होते. परंतु आता 'एमआयएम'ने उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे मतविभागणीचा फटका 'मविआ'ला बसण्याची शक्यता आहे. यामध्ये पुढील काही काळात बदल झाल्यास चुरशीची दुरंगी लढत अपेक्षित आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे गत दोन टर्मपासून चर्चेत असलेला सोलापूर लोकसभा मतदार संघ यंदाही वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. भाजपच्या नवख्या उमेदवारांकडून तब्बल दोनवेळा पराभवाची चव चाखावी लागलेल्या सुशीलकुमारांनी यंदा प्रथमच कन्या व सोलापूर शहर मध्यच्या आ. प्रणिती यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यासाठी 82 व्या वयात व तप्त उन्हातही स्वतः सुशीलकुमार पायाला भिंगरी लावून प्रचार कार्याला लागले आहेत. यासाठी त्यांनी जुन्या व नाराज झालेल्या काही नेत्यांना पुन्हा चुचकारत जवळ करत बेरजेचे राजकारण करण्यास आरंभ केला आहे. यामध्ये त्यांनी प्राधान्याने माजी आ. दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे यांच्याशी बोलणी केली आहेत. संपर्क साधला आहे. दुसर्‍या बाजूला स्वतः आ. प्रणिती यांनी प्रचारात बाजी मारण्यास आरंभ केला आहे. सकाळी लवकर घराबाहेर पडून रात्री उशिरापर्यंत विविध विधानसभा मतदार संघातील गावागावांसह नेत्यांच्या गाठीभेटीत त्या व्यस्त आहेत. दुसर्‍या बाजूला त्यांची सोशल मीडिया टीमही मोठ्याप्रमाणावर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. अन्य राजकारण्यांपेक्षा वेगळे काही करण्याच्या आ. प्रणिती यांच्या स्वभावास अनुसरून त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आ. राम सातपुते यांचे नाव जाहीर होताच त्यांना शुभेच्छा देणारे व हळूच राजकीय चिमटा घेणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रयोग करणार्‍या त्या तशा पहिल्याच व 'हटके'अशा राजकारणी ठरल्या आहेत.

उमेदवार जाहीर करण्याच्या गोंधळात महायुतीचा बराच काळ वाया गेला. अखेरीस माळशिरसचे आ. राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माला पडली. खरेतर स्वतः आ. सातपुते निवडणूक लढवण्यास राजी नव्हते. परंतु, खूप प्रयत्नांतीही महाआघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती यांच्या विरोधात म्हणावा तितका तगडा उमेदवार न मिळाल्याने अखेरीस आ. सातपुते यांनाच पुढे करण्याची वेळ पक्षावर आली. आ. सातपुते यांचा तसा सोलापूर शहर व लोकसभा मतदार संघात येणार्‍या विधानसभा मतदार संघाशी थेट संबंध नाही. अ. भा. विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री, भाजप युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशा संघटनात्मक विविध पदांवर संधी मिळाल्याने त्यांची पक्षश्रेष्ठींमध्ये उज्ज्वल प्रतिमा आहे. त्यातच त्यांना माळशिरस विधानसभा राखीव विधानसभा मतदार संघातून भाजपने आमदारकीची संधी दिल्याने त्यांचे नाव चर्चेत आले. त्यांच्या मतदारसंघात मोहिते-पाटलांशी सख्य राखत, त्यांना न दुखावता जी काही कामे करता येतील, ती त्यांनी केली. एका बाजूला मोहिते-पाटलांशी सख्य राखत दुसर्‍या बाजूला पक्षश्रेष्ठींशी जवळीक अशी दुहेरी भूमिका खूप छानपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सोलापूरच्या उमेदवारीची बक्षिसी मिळाली आहे. लोकसभा मतदार संघातील सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्याने त्यांना स्वतःचा विजय सोपा वाटत आहे.

अशातच आता 'एमआयएम'ने लोकसभा निवडणूक रिंगणात शड्डू ठोकण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच 'माकप'चे नेते, माजी आ. आडममास्तर यांनी आम्हाला विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचे आश्वासन शिंदे पिता-पुत्रीने द्यावे व विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ 'माकप'साठी राखीव ठेवावा, तरच आम्ही तुम्हाला मतदान करू, अशा अटी पुढे केल्या आहेत. त्यामुळे कालपर्यंत दुरंगी वाटणारी सोलापूरची लढत आता तिरंगी, चौरंगी होऊ शकते. येत्या काही काळात आणखी काही राजकीय हालचाली अपेक्षित आहे. 'एमआयएम'ने उमेदवारीची तलवार म्यान केल्यास व 'माकप'शी जुळवून घेण्यात शिंदे पिता-पुत्रीस यश आल्यास सोलापूर मतदार संघात दुरंगी व चुरशीची लढत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news