Lok Sabha Election 2024 : देशभरातील ‘टॉप टेन’ लढती | पुढारी

Lok Sabha Election 2024 : देशभरातील ‘टॉप टेन’ लढती

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील काही मतदार संघांतील लढती या लक्षवेधी असणार आहेत. विशेषतः सर्वच पक्षातील प्रमुख नेते ज्या ज्या मतदार संघातून लढणार आहेत, त्या मतदार संघातील लढती या लक्षवेधी असणार आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांचा समावेश आहे.

देशातील प्रमुख दहा लढतींमध्ये उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असेल. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून निवडणूक लढणार आहेत, तर त्यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे उभे असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांनी विक्रमी मताधिक्याने याच मतदार संघातून निवडणूक जिंकली आहे. गेल्या वेळी समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. तत्पूर्वी 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदींपूर्वी वाराणसीची जागा भाजपचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांच्याकडे होती.

देशातील दुसरी महत्त्वाची लढत केरळमधील वायनाडची असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दुसर्‍यांदा येथून निवडणूक लढवणार आहेत. सीपीआय नेत्या आणि महिला हक्क कार्यकर्त्या नी राजा यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. नी राजा या सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी आहेत. काँग्रेस आणि सीपीआय हे दोन्ही इंडिया आघाडीचे घटकपक्ष असल्याने या लढतीकडे देशाचे लक्ष असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभेत उत्तर प्रदेशच्या अमेठीतून आणि केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. यापैकी अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढणार आहेत.

वायनाडनंतर तिसरी लक्षवेधी लढत आहे ती गुजरातमधील गांधीनगरची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र काँग्रेसच्या माजी सहप्रभारी सोनल पटेल दत्त यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, गेल्यावेळीही अमित शहा यांनी विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकली होती.

अमेठी हा 2019 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. 2004 ते 2019 दरम्यान राहुल गांधींनी संसदेत अमेठीचे प्रतिनिधित्व केले. त्यापूर्वी त्यांचे काका संजय गांधी, वडील राजीव गांधी यांनीही अमेठीचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, 2019 ला राहुल गांधींना या मतदार संघातून पराभव पत्करावा लागला. 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला आणि पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी अमेठीमधून भाजपच्या उमेदवार आहेत. या मतदार संघातून इराणी यांची ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे. मात्र, अमेठीतून स्मृती इराणी यांच्याविरुद्ध कोण, याबद्दल अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. गेल्या वेळेप्रमाणे राहुल गांधी पुन्हा दोन मतदार संघातून निवडणूक लढवतील का आणि उत्तर प्रदेशातून अमेठीतूनच लढवतील का, याबद्दल अनेक चर्चा केल्या जात आहेत. मात्र, आतापर्यंत काँग्रेसच्या वतीने कुठलाही उमेदवार देण्यात आला नाही. तरीही अमेठीतील लोकसभा ही देशातील लक्षवेधी लोकसभांपैकी एक आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठीप्रमाणेच रायबरेली लोकसभा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गेली काही वर्षे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले. मात्र, काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेल्या. त्यामुळे 2024 च्या लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी त्यांच्या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात, अशाही चर्चा अधूनमधून होत असतात. परंतु काँग्रेससह भाजपने अद्यापही या मतदार संघातील उमेदवार जाहीर केला नाही.

महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघ देखील यावेळी देशात लक्षवेधी असणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तीन वेळा या लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. मात्र, वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर अजित पवार गट महायुतीत सामील झाला. सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध महायुतीने आतापर्यंत उमेदवार जाहीर केला नसला, तरी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने कुठल्याही परिस्थितीत हा लोकसभा मतदारसंघ जिंकायचा, असा चंग बांधला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांसह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील या ठिकाणी गतकाळात दौरे केले आहेत.

देशातील आणखी एक लक्षवेधी लढत म्हणजे छत्तीसगडमधील राजनांदगाव. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता गमावली. यानंतर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपचे संतोष पांडे हे उभे ठाकले आहेत. राजनांदगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 नंतर सातत्याने भाजपने ही जागा जिंकली आहे आणि अशा ठिकाणी काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्र्यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ही लढतदेखील लक्षवेधी असणार आहे.

वायनाडसह केरळमध्ये आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे तिरुवनंतपूरम. तिरुवनंतपूरममधून काँग्रेससाठी महत्त्वाचा चेहरा असलेले माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपने विद्यमान केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली आहे. याच मतदार संघातून सीपीआयनेपण पन्न्यान रवींद्रन यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथली लढत तिरंगी होणार आहे. दरम्यान, शशी थरूर या मतदार संघातून पुन्हा एकदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील, तर भाजप या ठिकाणी आपले खाते उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदार संघातून काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवलेले क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. अधीररंजन चौधरी काँग्रेसचे बंगाल प्रदेशाध्यक्ष असून, लोकसभेतील गटनेते आहेत. 1999 पासून ते सलग बहरामपूरचे संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. एकीकडे अधीररंजन चौधरी सहाव्यांदा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, तर तृणमूल काँग्रेस युसूफ पठाण यांच्या माध्यमातून ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

राजधानी दिल्लीतील नवी दिल्ली लोकसभा मतदार संघाची लढत ही देखील प्रचंड लक्षवेधी असणार आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या या जागेवर भाजपच्या दिवंगत नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज लढणार आहेत. मागील दोन लोकसभेत विद्यमान केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी ही जागा जिंकली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बांसुरी स्वराज यांच्याविरुद्ध आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे देखील त्यांना समर्थन असणार आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी, जगमोहन मल्होत्रा असे दिग्गज नेते या ठिकाणाहून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

Back to top button